वाडा वा प्रासाद वास्तुशैली

वाडा हा एक गृह-वास्तुप्रकार असून मालकाच्या सांपत्तिक ऐपतीनुसार त्याची बांधणी होत असल्यामुळे त्याचे आकार लहानमोठे आढळतात. सामान्यत: दोन चौक असलेल्या वास्तूपासून सात चौकांपर्यतचे (पुण्यातील मोरोबादादांचा वाडा )आणि एक/दोन मजल्यांपासून सात मजल्यांचे (शनिवारवाडा ,पुणे )वाडे उत्तर पेशवाईत आढळतात. मुळात वाडा ही वास्तुरचनेतील संकल्पना भारतात फार प्राचीन काळी अस्तित्वात होती. तिचा उल्लेख प्राचीन संस्कृत वाड:मयात (बाणभटटाची कादंबरी ) आणि विशेषतः वास्तुशिल्पशास्त्रावरील मध्ययुगीन ग्रंथात (समरांगणसूत्रधार)आढळतो;पण उत्तर पेशवाईत वाडा या वास्तुप्रकाराला अधिक महत्त्व प्राप्त झाले आणि पेशवे, त्यांचे आप्तेष्ट, सरदार ,सावकार, आश्रित यांनी पुणे,नाशिक,सासवड,सातारा,वाई,माहुली वगैरे ठिकाणी वाडे बांधले.तसेच मराठे ज्या ठिकाणी राजकीय हेतूने स्थायिक झाले. वा स्थिरावले, अशा ठिकाणही उदा: तंजावर,बागलकोट, ग्वाल्हेर, इंदूर,माहेश्वर ,बडोदे येथे त्यांनी वाडे बांधले.पेशवाईतील वाडे हा एक स्वतंत्र वास्तुवविषय आहे;कारण कार्यानुरूप आकारनिर्मिती, भक्कम पाया व इमारतबांधणी, सुक्ष्म कलाकुसर,छायाप्रकाराचे कार्यानुरूप नियोजन इत्यादी वैशिष्ट्ये त्यात आढळतात.

वाईतील सर्वात जुना वाडा गोपीनाथ पंत (शिवकालीन वकील )यांचा असून तो श्र्री.बापू नायकवडी यांनी खरेदी करून त्याचे प्रवेशद्वार व अन्य काही जुने अवशेष अद्यापि तिथे अवशिष्ट आहेत.त्यानंतरच्या काळातील प्रमुख वाड्यात आंधळीकर-उंब्रजकर देशपांडे,द्रविड यांचे वाडे छत्रपती शाहूमहाराजांच्या काळातील (१७०७-१७४९)अठराव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात बांधलेले असावेत.याशिवाय वाकडे,कोठावळे,पंडीत यांचे जुन्या वाईतील वाडे तसेच रास्ते वाडा,मोतीबाग),गंगाधरराव रास्ते (विद्यमान शासकीय मुद्रणालयाचा वाडा), हळबे,अनगळ,वैद्य,फडके,गणपतराव रास्ते (गोशाळे रास्ते वाडा)आणि रास्त्याचे आप्तेष्ट गाडगीळ,साठे यांनी बांधलेले आणि रास्त्यानी जागा व आर्थिक साहाय्य देऊन बांधले गेलेले देवकुळे वाडा,दातार वाडा,भानू वाडा,मेणवलीकर,जोशींचा वाडा,भावे वाडा, पटवर्धन वाडा वगैरे वाडे प्रसिद्ध आहेत. यातील बहुतेक सर्व वाडे अठराव्या शतकातील असून काही एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील आहेत. मेणवली येथील नाना फडणीसाचा वाडा सर्व वास्तुविशेषांच्या दृष्टिकोनातून परिपूर्ण असून तो विशेषतः भित्तिचित्रांसाठी प्रसिद्ध आहे. या वाड्यांपैकी काही वाडे १९४८ च्या गांधीवध जाळपोळीत पूर्णतः नष्ट झाले आहेत;काही वाड्याचे नूतनीकरण झाले आहे; काहींची बरीच पडझड झाली आहे,तर काही वाड्यांच्या जागी स्वतःच्या मालकीच्या सदनिका बांधल्या गेल्या आहेत. आता अवशिष्ट असणार्‍या जुन्या वाड्यांमध्ये शासकीय मुद्रणालय,(गंगापुरी),गोशाळे रास्ते वाडा (गणपती आळी),मोतीबाग (मोतीमहाल),नाना फडणीसांचा वाडा असे काही हाताच्या बोटांवर मोजता येतील एवढेच अस्तित्वात असून बाबासाहेब पटवर्धनांचा वाडा,भाव्यांचा वाडा वगैरे त्यांतल्या त्यात सुस्थितीत असणारे वाडे आहेत.

या वाड्यांच्या वर्णनाकडे वळण्यापूर्वी वाडा या वास्तुविशेषाची पेशवेकाळात वास्तुरचना कशी होती,हे पाहणे अधिक उचित ठरेल. पेशवेकाळातच वाडा-वास्तुरचना फार मोठ्या प्रमाणात झाली आणि वाई शहर हे पेशवाईतील एक प्रमुख ठिकाण असल्यामुळे ते याला अपवाद नव्हते.सामान्यतः वाडे हे तत्कालीन समाजातील उच्चभ्रू सरदार,सरंजामदार,सावकार इत्यादींनी बांधलेले आढळतात.त्यामुळे मध्ययुगीन काळात वाडा हा निवासस्थान, कार्यालय आणि अन्य दैनंदिन व्यवहारासाठी वापरला जाई. साहजिकच त्याचे दर्शनी स्वरूप गढीसारखे आणि संरक्षणाच्या दृष्टीने भक्कम असे.त्यामुळे वाड्याच्या सभोवती अनेकदा भक्कम दगडी संरक्षक भिंत बांधण्यात येई.वाड्याचे दरवाजे मोठे असत व त्याला दिंडी दरवाजा असे.दरवाजावर व दिंडी दरवाजावर गणेशपट्टी असावयाची. गणेशपट्टीवर काही ठिकाणी कलश,तर काही ठिकाणी गणपती व कडेने वेलपत्री कोरलेली असे. वाड्याचा दरवाजा शक़्यतो पूर्वाभिमुख किंवा उतराभिमुख असे.त्याला काही अपवाद वाईमध्ये आढळतात.उदाहरणार्थ,श्र्री. गणपतराव रास्ते यांनी इ.स.१७७१-७२ मध्ये गणपती आळीत गणपती मंदिराच्या बांधकामाच्या वेळी वापरलेल्या व उरलेल्या लाकूडफाट्याचा उपयोग करून बांधलेला वाडा होय.त्यास गोशाळे रास्ते वाडा म्हणतात.तो दक्षिणाभिमुख असून गेल्या पंधरा-वीस वर्षांत त्याच्या आतील बाजूस काही किरकोळ फेरबदल व सुधारणा झाल्या असल्या,तरी त्याचा मूळ ढाचा फारसा बदललेला नाही.साधारणतः प्रत्येक वाड्याला देवडी अथवा सदर असे व नंतर पहिला चौक, चौकात कारंजी वा हौद,नंतर मुख्य वाड्याचे जोते.ते साधारण:सव्वा मीटर ते दीड मीटर उंच असे.त्यामुळे ओसरी,माजघर,स्वयंपाकघर ही इतर दालने क्रमाने येत.दिवाणखाना पहिल्या मजल्यावर असे,दिवाणखान्यात स्त्रियांची उठण्या-बसण्याची स्वतंत्र व्यवस्था केलेली असे. त्यांच्यासाठी जिनेही वेगळे असत.भिंती रुंद म्हणजे दीड-दोन मीटरच्या असत. त्यामुळे बहुतेक जिने भिंतीत असत.जामदारखाना स्वतंत्र असे किंवा एखाद्या खोलीतच भिंतीची रूंदीं पाहून त्यात जडजवाहीर ठेवण्याच्या दृष्टीने सोय केलेली असे.दिवाणखाना,महालातील भिंतीवर,ओसरीवर,मुख्य भिंतीवर,चौकात आदी ठिकाणी सुशोभनासाठी पौराणिक प्रसंगांवरील चित्रे काढण्याची सर्रास पदधती होती.तत्त्वपोशीला नक्षीकाम करण्याची पद्धत होती.सामान्यतः वक्ररेषांकित समाकल छत असे.ही नक्षी लाखेने चिकटविलेली असे. रसिकतेनुसार दिवाणखान्यांतूनही कारंजी असत.तावदानांना रंगीत काचा वापरीत.हंड्या-झुंबरांची खूपच फॅशन होती.दिवाणखान्यात हंड्याझुबरे हमखास लावली जात असत.ती इटलीमधली व्हेनिस शहरातून मागविलेली असत.दिवाणखान्यातील अलंकरणाचे महत्वाचे घटक म्हणजे पर्णांकित रचनाबंध असलेली चन्द्रकोरी-झालरयुक्त महिरपी नक्षीदार कमान व त्या कमानीच्या बाजूंस असलेले सुरूचे नक्षीदार कोरीव स्तंभ होत.भारतात ही अलंकरणाची संकल्पना व प्रतिमान प्रथम मोगलकाळात शहाजहान बादशाहाच्या वेळी (कार:१६०६-१६५८)प्रचारात आले.पुढे ते राजस्थानात प्रविष्ट होऊन लोकप्रिय झाले.अठराव्या शतकात मराठ्यांचा माळवा व राजस्थानात संचार आणि संबध वाढला,तसे ते प्रतिमान देवाणघेवाणीतून महाराष्ट्रातील वास्तुशैलीत प्रविष्ट झाले. पुढे पेशव्यांनी राजस्थानातून गवंडी,कारागीर,कलाकार महाराष्ट्रात आपल्याबरोबर आणल्यामुळे  मराठ्यांच्या प्रासादात ते प्रतिमान प्रकर्षाने दिसू लागले.परिणामतः ही प्रतिमाने मराठ्यांच्या शाही वाड्यांतून सरसकट वापरात येऊ लागली.लाकडावर कोरीव काम करणारे कारागीर बहुधा कर्नाटकातील कारवारमधून आणले जात. एक खण साधारणतः दीड मीटरचा असे. मोठ्या वाड्यातील दालने पाचखणी,सातखणी अशी असत.ऐनाचे व सागवानी लाकूड वाशांसाठी वापरीत.ते टणक व कीड न लागणारे आणि विशेष म्हणजे पाण्याने सहजासहजी न कुजणारे मुबलक उपलब्ध होते. बांधकाम मुख्यतः चौकट संरचनात्मक व भार ग्रहणक्षम (लोड बेअरिंग)अशा दोन्ही प्रकारांनी केले जाई. लाकडी स्तंभ व खांब उभारताना वाळवी वगैरे प्रकारची कीड लागू नये म्हणून त्याचा चौथरा दगडी बनवून घेत.खांब जात्यात खुंटा बसवावा त्या पद्धतीने चौकोनी वा गोल तासलेल्या दगडात बसवीत असत. वर टाकलेल्या दोन तुळ्यांमध्ये जोडणार्‍या कड्या साधारणपणे ५ ते ९ सें.मी. रुंद असत.काही ठिकाणी १३सें.मी.रुंद आढळतात.त्यावर रिफाड व रिफाडवर माती टाकून जमीन करीत. पट्ट्यांना अंधेरी म्हणत.दिवाणखाना दुघई किंवा तिघई असे;कारण सुरूचे नक्षीदार खांब टाकून खोलीची रुंदी वाढविलेली असे.तसेच खिडक्यावरही महिरपदार नक्षीकाम असे.मेघडंबरी हा त्या काळातील वास्तुशिल्पाचा उत्तम नमुना व वैशिष्ट्य होय.बांधकामासाठी मातीत चुना,गवत,गूळ मळवून कुजवीत आणि आवश्यकतेनुसार त्यात राळ,साबुदाणा,डिंक,सरस वगैरे चिकटपणासाठी घालीत असत.अनेकदा घोटलेल्या भिंतीवर संदलासदृश चुन्याचा किंचितसा थर देत.त्यामुळे अशा भिंतींना भेगा व चिरा सहसा पडत नसत.त्यामुळे चित्रीकरणास त्या सुलभ होत.गवत मातीला धरून ठेवते म्हणून ते वापरीत असत.शिशाचा उपयोग मुख्यत्वे वास्तूच्या पायात करीत.घोटीव दगडाच्या भिंती बांधतानाही त्यांतील सांधे घट्ट व पक्के होण्यासाठी,सांधण्यासाठी शिशाचा रस ओतीत असत.उजेडासाठी हंड़यांखेरीज मोठ्या समयांचा उपयोग करीत.

 

मोतीबाग

वाईत सद्य:स्थितीत हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच पेशवेकालीन वाडे अवशिष्ट असून त्यातूनही काही अंतर्गत फेरफार वा बांधकाम केलेले आढळते.त्या दृष्टीने आजमितीस तसा पूर्णतः शाबूत असलेला प्रासाद वा वाडा म्हणजे वाईच्या उतरेस दीड किमी.वर असलेला मोतीमहल होय.मोतीबागेमध्ये एक दुमजली पूर्वाभिमुख हवेली आहे.ती सध्या असलेल्या उद्यानाच्या मध्यभागी आहे.ही आरामगृह किंवा समरपॅलेससारखी हवेली असून ती आनंदराव भिकाजी रास्ते यांनी इ.स.१७८७ मध्ये मोहिमांतून उसंत मिळताच आराम व मनोरंजनांसाठी बांधली असावी. हवेलीभोवती पूर्वी सुरेख बाग होती आणि चारही बाजूंनी विटांच्या भिंतींचा भक्कम प्रावकार होता.तो व हवेली अद्यापि सुस्थितीत असून बगीचा व त्यातील कारंजी उद्ध्वस्त झाली आहेत.ही वास्तू वा हवेली विजापूर येथील आदिलशाही असर महालासारखी बाहेरून दिसते.फरक एवढाच की,या वास्तूच्या कमानी अतिशय सुशोभित पर्णाकित रचनाबंधाच्या अलंकरणाचे नटलेल्या चन्द्रकोरी-झालरयुक्त असून असर महालाच्या कमानी रोमन कमानीप्रमाणे साध्या अनलंकृत आहेत.ह्या वास्तूच्या प्रवेशद्वारापाशी सोपावजा दोन खोल्या आहेत.त्या बहुधा पहारेकर्‍यांसाठी बांधल्या असाव्यात.दुसर्‍या द्वारातून आत गेल्यावर समोर हवेली दृष्टीस पडते.आतमध्ये भिंतीवर सर्वत्र भित्तिचित्रे आहेत.सर्वच दालनांतील समताल छते नक्षीदार व लाखकाम केलेल्या वेलबुट्टयांनी सुशोभित केली आहेत.सुरूचे कलाकुसरयुक्त स्तंभ आणि पर्णाकित नक्षीच्या लाकडी कमानी लक्षवेधक आहेत. वास्तूचे कलाकुसरयुक्त छत आणि स्तंभांमधील जागा राजस्थानी शैलीतील सुंदर भित्तिचित्रांनी चित्रांकित केली आहे.दुसर्‍या मजल्यावरील दिवाणखान्यात छताखाली चारी बाजूंस लघुचित्रे असून त्यांत पौराणिक विषयाबरोबरच काही लौकिक जीवनातील चित्रे आहेत.भिंतीवर महाभारत, रामायण, हरिविजय यांतील कथानकाची चित्रे असून घरगुती जीवनातील, युद्धभूमीवरील व शिकारीसारखी दृश्येही चितारली आहेत.एकूण मोतीबागेच्या या हवेलीत/प्रासादात सुमारे दोनशे लहानमोठी भित्तिचित्रे आढळतात.हवामानामुळे व काळाच्या ओघात त्यांत्तील काही भित्तिचित्रे निस्तेज व खराब झाली आहेत;मात्र त्यांवरील रंगसंगती अद्यापि टवटवीत वाटते.येथे साधारणत;२५ सेंमी x १२ सेंमी पासून १ मीटर x ०.५० मीटर आकाराची विविध विषयांवरची भितिचित्रे आहेत.या हवेलीच्या पुढच्या ओसरीवर तत्कालीन कारंजाचे अवशेष दृष्टोत्पत्तीस येतात.याशिवाय उद्यानात आयताकृती तळ्यात पूर्वी कमळे होती.हवेलीच्या अगदी समोरच्या वायव्य कोपर्‍यात एक मोठा आड असून त्यावरअजस्त्र असा रहाट बांधलेला आहे.या रहाटाला पत्र्याच्या बादल्या असून त्यांतून पाणी सुमारे चोवीस मीटर उंचीवर बांधलेल्या पाण्याच्या टाकीत पडण्याची व्यवस्था केली होती.या रहाट व गाडग्याची रचना अनेक घट वा गाडगी एकाच वेळी एका साखळीत गोलाकार लावून त्यातून पाणी सतत उपसले जाई.एका पाठोपाठ एक घट(गाडगी) पाणी भरून वर येत आणि रहाटाभोवती फिरून स्त्रो वरच्या हौदात रिकामे होत असत आणि पुन्हा पाणी वर आणण्यासाठी ते विहिरीत खाली जात असत. हे चक्र  सतत चालून त्यातून निरंतर पाण्याचा स्त्रोत वरच्या हौदात पडत असे.एकूण या रहाटगाड्ग्याची रचना,प्रवाहात सातत्य राहील अशा पद्धतीने केलेली होती.हे रहाटगाडगे बैल किंवा रेडा यांच्या साहाय्याने फिरविले जाई.येथे गतीची दिशा बदलण्याची व्यवस्था असून बैल किंवा रेडा जमिनीवर फिरतात,म्हणजे त्यांची गती जमिनीला समांतर असते. दात्यांच्या साहाय्याने दोन चाके एकमेकांशी काटकोनात बसवून या समांतर गतीचा रोख नव्वद अंशाने बदलला जाई.चाके जमिनीसरशी फिरण्याऐवजी जमिनीशी काटकोनात फिरतात आणि त्यांच्याबरोबर घटांची माळही फिरते. त्यामुळे वरच्या  हौदापर्यत घट वा गाडगे पूर्ण भरून गतीनुसार आपोआप रिकामे होते.

पूर्वीची ही पर्शियन व्हीलची संकल्पना आता क्वचितच पाहावयास मिळते.वाईतही तिचा प्रयोग आनंदराव रास्त्यांनी कारंजी आणि उद्यानातील  पाण्यासाठी प्रथमच केला. अशाच प्रकारचे रहाटगाडगे मेणवली येथील नाना फडणीसांच्या वाड्यात पाहावयास मिळते;मात्र तिथे उंचावर टाकी बांधलेली  दिसत नाही.अद्यापि या पर्शियन व्हीलचे रहाटगाडगे फार क्वचीत ठिकाणी आढळतात.या रहाटगाड्ग्याला ‘पर्शियन व्हील’असे म्हणतात; कारण हे प्रतिमान इराणमधून भारतात प्रविष्ट झाले आहे.वरच्या उंच टाकीतील पाणी सायफन पद्धतीने खापराच्या नळावाटे उद्यानात सर्वत्र फिरविले असून वास्तूतही आणले आहे. शिवाय वाई शहरातील काही मंदिरांतही आणले होते हवेलीच्या चारही बाजूंना चौकोनी आकाराचे वाफे बांधले असून त्या सर्वांना पाणी पुरवण्यासाठी अंतर्गत पाट बांधण्यात आले आहेत. या भव्य वास्तूच्या पाठीमागे चौरस आकाराची खोल बांधीव सुरेख तलाववजा विहीर आहे.तिला उतरण्यासाठी पायर्‍या असून पण त्यांसाठी (रात्रीच्या वेळी पोहता यावे म्हणून)भिंतीत कोनाडे आहेत. रास्तेमंडळी या विहिरीचा वापर पोहण्यासाठी करीत.किंबहुना रात्रीच्या वेळी मंद प्रकाशातही ते पोहत असावेत.या प्रासादात दिवाणखान्यात पश्चिमेला एक छोटे दालन आहे.तिथे बैठकीचे आसन असावे आणि सभागृहात मनोरंजनाचे कार्यक्रम होत असतील.असे सकृद्ददर्शनी वाटते.

 

रास्ते वाडा गंगापुरी(शासकीय मुद्रणालय)

गंगापुरीमध्ये वाईतील अगदी सुरुवातीचा रास्त्यांनी बांधलेला वाडा (विद्यमान शासकीय मुद्रणालय) असून त्याचे बांधकाम गंगापुरीची नवीन वस्ती होण्याच्या सुमारास म्हणजे इ.स.१७५०-५५ दरम्यानचे असावे.हा वाडा गंगाधर भिकाजी रास्ते यांनी बांधला आहे.हा वाडा पूर्वाभिमुख असून वाड्याच्या सभोवती मजबूत उत्तम दगडी बांधणीचा तट आहे.त्याची लांबी ७५.५५ मीटर व रुंदी ३० मीटर आहे.तटाच्या भिंतींची रुंदी १.४० मीटर आणि उंची ८.१० मीटर आहे.त्यामुळे तटावरून फिरण्याची वाट केलेली असून तटाच्या चार बाजूंस लहान बुरुज आहेत.शिवाय शत्रूवर गोळीबार करण्यासाठी तटास चौफेर लहान भोके ठेवलेली आहेत. वाड्याचा दर्शनी भाग पुण्यातील शनिवार-वाड्याप्रमाणे(त्याची छोटी प्रतिकृती)असून त्याच्या मध्यभागी भव्य दरवाजा (३ मीटर उंच व १.७१ मीटर रुंद)आहे. तिथे दोन रखवालदारांसाठी कठडे आहेत.या दरवाजातून (महाद्वार)आत प्रवेश केल्याबरोबर थोड्या अंतरावर आतील मूळ वाड्याचा दरवाजा दिसतो.हाही दरवाजा मोठा (२.५ मीटर उंच व १.२५ मीटर रुंद)असून वाड्यात दोन चौक आहेत.हा वाडा जुन्या पद्धतीचा असून   भक्कम व उत्तम नक्षीदार आहे.वाड्यांतील चौकांचे प्रत्येकी क्षेत्रफळ ९ x ९ चौरस मीटर आहे.हा वाडा दुमजली असून वरच्या मजल्यावर पूर्वी दिवाणखाना होता.त्याची तक्तपोशी वक्ररेषांकित समाकल छताची, नक्षीने नटलेली लाखकाम केलेल्या बेलबुट्ट्यानी सुशोभित केलेली होती.दिवाणखान्यात नक्षीदार कमानी व महिरपीनी नटलेले स्तंभ होते. छताची नक्षी लाल रंगाने रंगविलेली सुरेख दिसत असे.हंड्या व झुंबरे दिवाणखान्यात लावलेली होती.तीत पर्णाकित रचनाबंध असलेली चंद्रकोरी झालरयुक्त कमान व सुरूचे नक्षीदार कोरीव स्तंभ होते.साधारणतः हा दिवाणखाना ९ खणांचा (सु.१५मीटर) असून त्याला ५ लहान व २ कमानी होत्या;याच पहिल्या चौकातील दुसरा दिवाणखाना २ सोप्यांचा (दुघई)होता.दोन्ही सोप्यांस पुढील दिवाणखान्याप्रमाणेच कमानी आहेत;मात्र पहिल्या दिवाणखाण्यापेक्षा याची उंची कमी असून लाकडी छतावरील नक्षीकाम व अलंकरणही अप्रतिम होते.पुढील सोप्यात कारंजे होते.मागील सोप्यात दोन्ही कोपर्‍यात दोन-दोन खणाच्या खोल्या आहेत.वाड्यात भितिचित्र होती.त्यांपैकी फार थोडी अवशिष्ट असून त्यांपैकी एक फुलदाणीचे भितिचित्रे लक्षणीय आहे.वाड्याच्या सभोवती तटाच्या आत बरीच मोकळी जागा असून पूर्वी तीत बाग होती. दक्षिण बाजूस एक मोठी गोलाकार विहीर आहे.तटावर जाण्यास चारी बाजूंच्या भिंतींतून जिने काढले आहेत.संरक्षणाच्या दृष्टीने या वाड्याचे बांधकाम केले असल्यामुळे त्यात संरक्षक दलासाठी स्वतंत्र दालने ठेवली होती.स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश शासनाने या वाड्यात मुन्सफ कोर्ट(न्यायालय)व न्यायाधीशांची राहण्याची सोय केली होती.त्यामुळे पुढील चौकात खाली न्यायालयाची  कचेरी व दिवाणखान्यात माडीवर न्यायदान(कोर्ट)अशी व्यवस्था होती. मागील चौकात न्यायाधीश राहत असत.१९४२ च्या छोडो भारत आंदोलनातील क्रांतिकारकांनी त्यात आग लावली.त्यास वाड्याचा अर्धाअधिक लाकडी भाग जळून खाक झाला,तरीसुद्धा पुढे काही वर्षे तिथे कोर्ट भरत असे.

 

गोशाळे रास्तेवाडा

गणपती आळीमध्ये गणपतराव भिकाजी रास्ते यांनी गणपतीच्या मंदिराच्या बांधकामासाठी वापरलेल्या लाकडाचा आणि अन्य राहिलेल्या सामानाचा उपयोग करून ढोल्या गणपतीच्या प्रतिष्टापनेनंतर(इ.स.१७६२)काही वर्षांनी एक वाडा बांधला.ह्या वाड्यात त्यानी गायी ठेवल्या होत्या.म्हणून तो वाडा गोशाळे रास्तेवाडा म्हणून प्रसिद्धीस आला.या वाड्याचे १९७० नंतर अंतर्गत सजावटीचे नूतनीकरण करण्यात आले आणि दर्शनी भागात दुकाने काढण्यात आली.त्यानंतर काही किरकोळ बद्दल अन्त:स्थ खोल्यांमध्ये करण्यात आले.पुढे इ.स.२००४ नंतर या वाड्याच्या मागील माजघरानंतरचा भाग पाडून तिथे अन्नपूर्णा मंगल कार्यालय बांधण्यात आले आहे. त्यामुळे याचे मूळ स्वरूप बदललेले असले,तरी चौक,त्यासभोवतीचे सोपे आणि देवड्या(मुख्य द्वाराजवळची ओटी)सुस्थितीत आहेत.तदवतच देवडीवरील दिवाणखाना आणि पोटमाळे अवशिष्ट आहेत.चौकातील दगडी जोती स्पष्ट दिसतात.चौकाच्या चारी बाजूंस सोपे असून पुढील सोप्यात उजव्या बाजूस रास्त्याचे देवघर आहे.त्यात रास्तेघराण्यातीलप्रमुख मूळ देव आहेत.जाड भिंतीतून जिने काढलेले आहेत.मात्र माजघर,बांळतिणीची खोली, जवाहरखाना,मुदपाकखानां,आणि गोठे हे कालौघात आता नष्ट झाले आहेत. प्रस्तुत वाड्यात कुठेच भित्तिचित्रे नाहीत आणि कलाकुसरयुक्त,सुरूचे खांब नाहीत;मात्र हंड्या,झुबरे आढळतात.

आनंदराव भिकाजी रास्ते यांनी आपल्या नातवास म्हणजे रामचंद्रबाबा साठे यांस आप्पांजीमहादेव साठे(जावई)वारल्यानंतर(१७८८)पालनपोषणार्थ वाईस आणले आणि त्यास धर्मपुरीत स्वतःचा राहता वाडा राहण्यास दिला व स्वतःकरिता गणपती आळीत स्वतंत्र,भव्य व मोठा वाडा इ.स.१७९१-९२ दरम्यान बांधला .या ठिकाणी त्यांच्या वंशजांचे स्वातंत्र्यपूर्व काळापर्यंत जाऊनयेऊन वास्तव्य होते.पुढे येथे नगरपालिकेचे कार्यालय झाले.आणि तो पाडून नवीन इमारतीचे बांधकाम सुरू होण्यापूर्वीच आगीच्या भक्षस्थानी तो पडला (इ.स.२००८).या वाड्यासाठी आनंदराव रास्ते यांनी आपले मेहुणे गाडगीळ(सगुणाबाई या कनिष्ठ बहिणीचे यजमान)यांच्याकडून जागा घेतली आणि त्या मोबदल्यात त्यांना मोतीबागेजवळ पर्यायी दिली.या तीनमजली प्रासादाच्या भव्य प्रवेशद्वारावर दोन उत्कृष्ट दिवाणखाने होते आणि त्यात नक्षीदार सुरूच्या खांबावरील आधारित छत अत्यंत कलात्मक रंगविलेले होते.तत्त्वपोशीवर नक्षीकाम केलेले होते.ही नक्षी लाखेने चिकटविलेली होती. हा पूर्वाभिमुख वाडा साधारणत:तीनचौकी,अनेक खोल्यांचा आणि दगडी भक्कम तटबंदीने वेढलेला होता.

 

कन्या शाळा

या वाड्याच्या पाठीमागे मधल्या आळीत रास्त्यांनी एक वाडा बांधला होता.सध्या जिथे कन्याशाळा आहे,तो हा वाडा असून तो द्रविड बंधूनी विकत घेतला व त्या ठिकाणी द्रविड हायस्कूल काही वर्षे चालविले.पुढे तिथे मुलींची शाळा सुरू करण्यात आलीं.तीं पुढे हिंगण्याच्या स्त्री-शिक्षणसंस्थेला जोडण्यात आलीं(१९४९).नंतर इ.स.१९५० मध्ये हा द्रविड वाडा संस्थेने विकत घेतला व त्या ठिकाणी तीनमजली इमारत बांधली,यामुळे दोन्ही शाळांच्या अनुक्रमे वर्गासाठी यात आमूलाग्र बदल करण्यात आले; तथापि या वाड्यातील काही जुने अवशेष अवशिष्ट असून त्याचा पश्चिमाभिमुख भरभक्कम दगडी दरवाजा व दिवाणखाना हे लक्षणीय होत.यातील दिवाणखाना व त्याचे कलात्मक छत शाळेने सुव्यवस्थित जतन केले आहे.विशेषतः त्याची तत्वपोशी आणि त्यावरील नक्षीकाम तत्कालीन काष्ठशिल्पांचे उत्कुष्ट नमुने होत.

 

पटवर्धनवाडा,गंगापुरी

मधल्या आळीत याव्यतिरिक्त गाडगीळांचे दोन वाडे होते; पण त्यांपैकी एकाचा पश्चिमाभिमुख दगडी दरवाजा सोडता अन्य काहीच अवशेष शिल्लक नाहीत.दुसर्‍या वाड्याच्या जागी पूर्णतः स्वमालकीच्या सदनिकांचे बांधकाम झाले आहे. वैद्याच्या वाड्याची स्थितीही तशीच आहे. त्याचेही नूतनीकरण झाले आहे.रास्तेकाळात वाईत बरेच जुने वाडे होते. पण कालौघात त्यापैकी काही पडले आणि शहरीकरणाबरोबर त्यांच्या जागी स्वमालकीच्या सदनिकांचे बांधकाम होऊ लागले.त्यामुळे मध्ययुगीन वाडासंस्कृती आणि वाडा-वास्तुविशेष यांचा आता जवळजवळ लोप झाला आहे;तथापि कै.बाबासाहेब पटवर्धन यांचा गंगापुरीतील वाडा अद्यापि बराच सुस्थितीत असून ही वास्तू विद्वान संस्कृत पंडित कृष्णशास्त्री पटवर्धन यांनी अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात बांधली आहे. कृष्णशास्त्री पटवर्धन हे श्रीमंतपेशवे यांचे धार्मिक विषयावरील बाबीचे सल्लागार होते.ते श्रीमंत पेशव्यांना मोहिमा व स्वारी करण्यासाठी प्रस्थान मुहूर्त(स्वारीवर निघण्याची शुभ वेळ)काढून देत असत. ह्यामुळे पेशव्यांनी रास्त्यांकरवी त्यांच्या वास्तव्याकरीता वाई येथे गंगापुरीमध्ये जागा आणि द्रव्य दिले.त्यातूनच या वाड्याची निर्मिती झाली असावी कृष्णशास्त्री पटवर्धन यांना एकूण पाचभाऊ होते आणि गंगाधर नावाचा एक मुलगा होता.त्याचा जन्म या वाड्यातच झाला.तो अतिशय हुशार व चाणाक्ष होता. त्याची हुशारी व दक्षता पाहून ऐन विशीत ह्यास सदर गायकवाड यांनी आपल्या बडोदे संस्थानात नेले आणि त्यास दिवाणजीपद बहाल केले.(संदर्भ-कै.द.न.उर्फ बाबासाहेब पटवर्धन यांचे मुत्युपत्र दिले.

मूळ वाडा दोनचौकी,दुमजली,तिघई आहे.त्याच्या पश्चिमेस पडव्या व त्यांवर माडीं आहे. त्यावरील दिवाणखाना नऊखणी असून त्याला लागून असलेल्या शयनगृहात चारी बाजूंच्या भिंतीवर सुरेख भिंतींचित्रे आहेत.ती पटवर्धनकुटुंबाच्या दक्षतेमुळे सुस्थितीत राहिली आहेत. वास्तूच्या पूर्वेस भव्य प्रांगण व पुढे रस्ता आहे.उत्तरेस सुमारे ४.५० मी.बोळ असून पश्चिमेस परसू आहे. दक्षिणेसरानडेवाडा आहे.प्रांगणाच्या पुढील बाजूस (पश्चिमेस)पूर्वी जोत्यावर लांबसडक सोपा किंवा ओसरी होती व त्याच्या उजव्या कोपर्‍यात (उत्तरेला)देवघर होते.सोप्यात पूर्वेकडील तटबंदीतील प्रवेशद्वारासमोर वाड्यात प्रवेश करण्याचा भव्य दरवाजा असून या दरवाजावरील काष्ठशिल्प विशेषतः गणपतीची लाकडातील कोरीव मूर्ती विलक्षण सुंदर आहेत.अलीकडच्या काळात वाड्यात काही नवीन बांधकाम व डागडुंजी करण्यात आली आहे.

 

भावेवाडा,ब्राह्मणशाही

ब्राह्मणशाही येथील कोटेश्वर मंदिराच्या पिछाडीस विनोबा भावे यांच्या पूर्वजांनी अठराव्या शतकाच्या अखेरीस बांधलेला वाडा जीर्णशीर्ण अवस्थेत तग धरून आहे.या वाड्याच्या पूर्वेकडील दर्शनी  भागात आणि दिवाणखान्यात उत्तम प्रकारचे काष्ठशिल्प तुल्यांवर,स्तंभशीर्षावर आढळते.विविध कोरीव मूर्ती,फुलापानांचे रचनाबंध भौमितिक आकृतिबंध आणि हंस-मोरांसारख्याप्राण्यांचे अलंकरण आहे.हा वाडा बहुधा वतनदार शिवाजी नारायण भावे किवा त्यांच्या चिरंजीवांनी बांधला असावा;कारण पेशव्यांनी त्यांच्या एकनिष्ठ सेवेबद्दल त्यांना बागेसाठी दहा एकर जमीन वाई येथे दिली होती.आणि रास्त्यांच्या आश्रयाने हे घराणे वाई येथेच स्थायिक झाले.शिवाय नारायण यांचा नातू  कृष्णराव यांच्या पत्नीने पतीच्या स्मरणार्थ कृष्णेश्वराचे मंदिर बांधले.त्याला रखमेश्वर किंवा श्रावणेश्वर म्हणतात.कृष्णरावांचा मुलगा नरसिंहपेशवेदरबारी सरदार होता.त्याने आपल्या सरदारांना साहाय्य केले म्हणून त्यास गागोदे(तालुका पेण,जिल्हा रायगड)हे गाव इनाम मिळाले.नरसिंगरावाचा मुलगा शंभूराव भावे याने १८७० पूर्वी केव्हातरी कोटेश्वर मंदिर बांधले.या जीर्णशीर्ण झालेल्या मंदिरात दक्षिणोत्त्त्तर भिंतींवर भित्तिचित्रे आहेत.ती बरीच खराब व अस्पष्ट झाली आहेत.

 

मेणवली नाना फडणवीस वाडा

मेणवली येथील वाडा ही वाई परिसरातील अत्यंत सुस्थितीत असलेली मध्ययुगीन मराठा वाडावास्तुशैलीतीत प्रशस्त हवेली असून तीत मुत्युदंड चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी काही किरकोळ दुरुस्त्या व रंगरंगोटी करण्यात आली होती(१९९५-९६);तरीसुद्धावाड्याचा मूळ ढाचा सुस्थितीत असून फडणीस यांना तत्कालीन छत्रपतींचे सरदार भगवंतराव त्र्यंबक पंतप्रतिनिधी आणि रघुनाथ घनश्याम मंत्री(सातारा)यांनी इ.स.१७६८ मध्ये वाईच्या पश्चिमेकडील हा भाग  इनाम म्हणून दिला.तिथे नानांनी मेणवली हा टुमदार गाव वसविला आणि त्या ठिकाणी कृष्णा नदीकाठी चारसोपी पूर्वाभिमुख भव्य वाडा इ.स१७७० मध्ये बांधला.या वाड्याच्या मागे नाना फडणीसांनी चंद्रकोरीच्या आकाराचा घाट बांधला आणि मेणवलेश्वर(मेणेश्वर)आणि वाडा हे भित्तिचित्रांनी अलंकृत केले.या दुमजली व पोटमाळा असलेल्या भव्य वाड्याच्या भोवती दगडी भक्कम भिंत असून पूर्वेस मुख्य प्रवेशद्वारावर नौबतखाना(नगारखाना)आहे. त्याच्या आतील बाजूस उघड्या सोप्यासमोर कारंजे असून आतील उजव्या बाजूस सुरेख वर्तुळाकार चिरेबंदी पत्थरांत बांधलेली मोठी विहीर आहे.वरती त्याला चार रहाटगाडगी होती.या विहिरीचे पाणी खापरी नळाद्वारे वाड्यात सायफन पद्धतीने सर्वत्र नेले होते. या खापरी नळांचे काही अवशेष अद्यापि अवशिष्ट आहेत.उघड्या सोप्याच्या बाजूस उजव्या बाजूने गेले असता माजघर वं त्याला लागून देवघर आहे.भिंतीतील पहिल्या जिन्यावरून वर गेले असता सहाखणी दिवाणखाना लागतो.त्याच्या लाकडी कमानी आणि छत अनुक्रमे नक्षीदार व कलाकुसरयुक्त समांतर समभुज चौकोनी पदकांच्या रचनांनी युक्त आहे. तिथे झुंबरे,हंड्या यासाठी आकडे  ठेवलेले आहेत.दिवाणखान्याला लागून नाना फडणीसांचे शयनगृह होते.त्यात नानांचा भव्य पलंग ठेवलेला आहे.पहिल्या चौकात सुमारे एक मीटर उंचीवर चारी बाजूंनी खोल्या बांधलेल्या असून अशीच रचना उर्वरित तीन चौकात आहेत.६x६ मीटर चौरस क्षेत्रफळांचे उघडे चौक असून त्यांतील पाण्याचा निचरा होण्याची जलनिस्सारण योजना आधुनिक अभियांत्रिकीला आव्हान देणारी आहे. चौकांच्या योजनेमुळे भरपूर प्रकाश व हवा आपातत: वरच्या मजल्यापर्यंत खेळती राहते.तसेच भिंतीचा गिलावा मातीत गवत कुजवून केलेला असल्यामुळे वं त्यावर बारीकसा चुन्याचा थर दिल्यामुळे आज सुमारे दोन-अडीचशे वर्षे झाली,तरी त्याला चिरा पडलेल्या नाहीत किंवा पोपडे पडत नाहीत,अशा उत्तम सुरेख भिंतीवर शक्य झाले आहे.वाड्यातील स्त्री-वर्गाला घाटावर स्नानासाठी जाण्यासाठी मागील  बाजूस स्वतंत्र व्यवस्था केली आहे.

या वाड्यातील जिऊबाईची खोली ही उत्तरेकडील भागात असून तिथली भित्तिचित्रे सुस्थितीत आहेत; कारण नाना फडणीसांच्या या शेवटच्या पत्नीने ब्रिटिशांनी जप्त केलेले उत्पन्न सोडविण्यासाठी अथक प्रयत्न केले आणि सुदैवाने तिला दीर्घ आयुष्यही लाभते.तिने आपल्या जीवनातील दीर्घकाळ मेणवलीतीलया वाड्यात व्यतीत केला.ऐवढेच नव्हे तर नाना फडणीसांनी त्याच्याकडे असलेल्या काही मौल्यवान वस्तू,कागदपत्रे अखेरच्या दिवसांत इथे सूरक्षितत्तेच्या दृष्टिकोनातून आणून ठेवली होती .त्यांचे जतन,संरक्षण जिऊबाईंनी केले.एवढेच नव्हे तर ती नीटनेटकी लावून ठेवली.त्यामुळे रावबहादूर द.ब.पारसनीस किंवा इतिहासाचार्य वि.का.राजवाडे यांना हा अमोल ऐतिहासिक ठेवा पाहावयास मिळाला.रावबहादूर द.ब.पारसनीसांनी तर मेणवली दप्तरातील हजारो कागद हस्तगत करून ते रुमाल सातारच्या पारसनीस म्युझियमध्ये सुव्यस्थित ठेवले.पुढे इ.स.१९३८ मध्ये ब्रिटिश शासनाने ते त्यांच्या वारसांकडून विकत घेऊन पुण्याच्या डेक्कन कॅालेजमध्ये संशोधकांना उपलब्ध होतील,अशी व्यवस्था केली.सदर वाड्यात नाना फडणीसांचे केव्हा आणि किती दिवस वास्तव्य होते,या विषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही;तथापि नाना फडणीस इ.स.१७९१ मध्ये सवाई माधवराव पेशव्यांबरोबर वाईस आले असता त्यांचा मुक्काम मेणवली येथे असल्याची नोंद आहे.तसेच दुसरा बाजीरांव(कार -१७९५-१८१८)याने नाना फडणिसांना बडतर्फ केल्यानंतर ते वाड्यात काही महिने मुक्कामास होते.याशिवाय पहिल्या माधवराव पेशव्यांच्या कारकिर्दीत(कार १७६१-१७७३)त्यांनी वाड्याचे बांधकाम केल्यानंतर त्यांचा सपत्नीक मुक्काम येथे अनेक दिवस होता.