मराठेशाहीच्या कालखंडात विशेषतः पेशवाईत महाराष्ट्रात राजकीय उत्कर्ष व विस्ताराबरोबरच सांस्कृतिक क्षेत्रातसुद्धा अनेक जडणघडणी झाल्या.या काळात कलेच्या क्षेत्रात महाराष्ट्रात विविधांगी बदल झाले.स्थापत्यकला, शिल्पकला,हस्तकला,चित्रकला, विशेषतः भित्तिचित्रकला यांसारख्या कलांचा विकास झाला.यांपैकी चित्रकलेचा वारसा महाराष्ट्राला अगदी प्राचीन काळातच मिळाला होता.अजंठा,वेरूळ येथील गुंफांमधील भित्तिचित्रे केवळ लक्षणीय नसून जगप्रसिद्धही आहेत.नंतर म्हणजे आकरावे ते अठरावे शतक या काळातही महाराष्ट्रातील चित्रकलेची परंपरा निरंतर सुरू होती.मात्र या काळातील चित्रकलेचे नमुने वा अवशेष फारसे पाहावयास मिळत नाहीत. राष्ट्रकूटकालीन 'यशस्तीलक’आणि ’विष्णूधर्मोत्तर पुराण’ या ग्रंथातून चित्रकलेविषयी काही महत्त्वपूर्ण माहिती मिळते. मराठी अमलात शिवकालीन चित्रकामाचे अस्तित्व रामदासस्वामींच्या कारखाने प्रकरणातील चित्रशाळेच्या संदर्भात स्पष्ट जाणवते. पुढे  शाहिरी वाड्मयात तर चित्रकामाच्या उल्लेखांची रेलचेल आहे . या उल्लेखांपैकी शाहीर प्रभाकराने खाशा स्त्रीच्या रंगीत हवेलीतील भित्तिचित्राची जी यादी काव्यबद्ध केली आहे.त्याबरहुकूम प्रसंगाची चित्रमालिका काही जुन्या वाड्यातील भिंतीवर अजूनही अवशिष्ट आहे.या वाड्मयीन उल्लेखांवरून एक गोष्ट स्पष्ट होते की, महाराष्ट्रात चित्रकलेची परंपरा इ.स.पहिल्या शतकापासून अखंड़ित होती, याविषयी संशय नाही.

पेशवाईतील सुबत्ता आणि शांततेच्या काळात रसिक मराठ्यांच्या  आश्रयाने जुन्या चित्रपरंपरेचा अभिनव आविष्कार प्रकट झाला. पेशवेकाळात मंदिरवास्तुशिल्पशैलीला उत्तेजन मिळाले तद्वतच निवासस्थानासाठी भव्य प्रासादांची-वाड्यांची निर्मिती झाली आणि विविध कलांच्या विकासाबरोबरच  भित्तिचित्रकलेचा विकास झाला आणि तिला उत्तेजन ही मिळत गेले.या काळात म्हणजे इ.स.१७०८ ते १८१८ मराठी सत्तेच्या विस्ताराबरोबर उत्तर आणि दक्षिण भारतीय संस्कृती आणि कलांचा प्रभाव महाराष्ट्रातील कलांवर पडला;  कारण मराठ्यांचा संचार मोहिमांच्या निमित्ताने या दोन्ही प्रदेशांत होत होता आणि त्यातून काही कलाकारांची आदान-प्रदान क्रिया घडत होती. अर्थातच या प्रभावाला भित्तीचित्रकला अपवाद नव्हती. मराठेकालीन चित्रकलेचा खरा व स्पष्ट आविष्कार या भित्तिचित्रकलेमधून दृग्गोचर झालेला अढळतो. पेशवेकालीन काही चित्रकारांची नवे पेशवेदप्तरातून व पत्रव्यवहारातून आढळतात.या नोंदींमध्ये चित्रकार आणि चित्रे यांची सविस्तर माहिती मिळते.

पहिल्या बाजीराव(इ.स.१७२०-१७४०) पेशव्यानच्या पदरी माणकोजी नावाचा प्रसिद्ध चित्रकार होताt.त्याला दरमहा तीस रुपये मेहनताना दिल्याचा उल्लेख पेशवेदप्तरात आढळतो.याशिवाय पहिल्या बाजीरावांनी इ.स.१७३० च्या सुमारास जयपूरहून (राजस्थान)भोजराज नावाचा एक कुशल व तज्ञ चित्रकार आणला होता.त्याच्या बरोबर आणखी काही चित्रकार राजस्तानहून त्या वेळी आले असावेत; कारण या सुमारास पहिल्या बाजीरावांनी पुण्यात शनिवारवाड्याच्या बांधकामासप्रारंभ  केला होता.या कुशल चित्रकारांच्या हाताखाली त्यावेळी महाराष्ट्रातील, विशेषतःपुण्यातील चित्रकारांनी काम केले असावे.  राघोबादादा याने नाना फडणीस यांस इ.स.१७६५ मध्ये पत्र लिहून माणकोजीस आनंदवल्ली येथे बोलवून घेतले होते. बाळाजी बाजीराव (नानासाहेब पेशवे)या पेशव्याने शनिवार-वाड्याच्या भिंतींवर चित्रे काढून घेतली होती.या वाड्याची व्यवस्था पाहणारा जिवाजी गणेश खासगीवाले याच्या एका पत्रात राघो,तानाजी,अनुपराव या चित्रकारांचा उल्लेख आहे. मराठा सैन्याचासंचार दक्षिण हिंदुस्थानात व उत्तर हिंदुस्थानात असल्यामुळे  तिकडूनही पेशव्यांनी विशेषतः जयपूर, उदयपूर, आग्रा, दिल्ली, कर्नाटक येथून कलाकार आणल्याच्या काही नोंदी आढळतात.सवाई माधवराव पेशव्यांच्या काळात (कार .१७७४-१७९५) इंग्रजांचा पेशवेदरबारी असलेला वकील चार्ल्स याने या चित्रकारांना पुणेदरबारी ठेवल्याचा उल्लेख मिळतो. यांपैकी केवळ वाईतील  मोतीबाग या आनंदराव रास्ते  यांनी बांधलेल्या विश्रामधामात (मोतीमहाल-समर पलेस) सुमारे २१०-२३० लहानमोठी भित्तीचित्रे आहेत.

या भित्तिचित्रांच्या  कालाविषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही;  पण वाईतील पंत राजाज्ञे  (देशपांडे)यांच्या वाड्यातील भित्तीचित्रे कालदृष्ट्या प्रारंभीची असावीत. हा वाडा छत्रपती शाहूमहाराजांच्या कारकिर्दीत (कार. १७०८-१७४९) इ.स.१७२७-३० दरम्यान बांधल्याची नोंद आहे. उर्वरित वाईतील भित्तिचित्रे उत्तर पेशवाईतील म्हणजे इ.स.१७५०ते१८१८ व काही नंतरची एकोणिसाव्या शतकातील आहेत;मात्र भित्तिचित्राची परंपरा विसाव्याशतकाच्या पहिल्या-दुस-या  दशकातही  चालू असल्याचे नमुने वाईत मिळतात.

भित्तीचित्रे वाड्याच्या संबंध भिंतींवर, कधीकधी दर्शनी  भागावर,मधल्या चौकातील भिंतींवर, काही ठिकाणी  छतांवर, खिडकीच्या बाजूने व खिडकीच्या वरील बाजूस,दारे- खिडक्या यांच्या

चौकटीभोवती  वैगेरे अनेक ठिकाणी चितारलेली आढळतात. शयनगृह व देवघर ही याला अपवाद नाहीत. जुन्या वाड्यात भिंतीमध्ये ठरावीक अंतरावर लाकडी खांब असत. त्यामुळे भिंतीच्या  चौकोनी भागांमध्ये चित्रे रेखाटली जात असत. भितीचीत्रे केवळ वाड्याच्या भिंतींवर काढली जात असे,नव्हे  तर ती मंदिराच्या भिंतींवरसुद्धा काढली जात. श्रीराम मंदिर, उमामहेश्वर-पंचायत मंदिराच्या सभागृहातील चारी भिंतींवर चित्रकाम आहे. एवढेच,नव्हे, तर काशीविशेश्वरच्या नगारखान्यात

छताखाली दरवाजावर दोन्ही बाजूस आढळते व दास्तानाच्या भिंतींवर मेणेश्वर मंदिरातही (मेणवली) भित्तीचित्रे आढळतात.

वाईमध्ये मोतीबागेतील आरामगृहाव्यतिरिक्त  मेणवलीकर  जोशी यांचा वाडा,कै.द.न.उर्फ बाबासाहेब पटवर्धन यांचा वाडा,रस्त्यांचा वाडा (सध्या येथे शासकीय मुद्रणालय आहे),देवकुळेवाडा,अपटेवाडा (सर्व गंगापुरी) यांतून भित्तिचित्रे आढळतात. मात्र या वाड्यापैकी मेणवलीकर  जोशी यांचा वाडा पाडून त्या ठिकाणी स्वतःच्या मालकीच्या सदनिका (ओनरशिप )झाल्या आहेत(२००९). तीच गोष्ट देवकुळेवाड्याच्या बाबतीत झाली आहे.

त्यामध्ये प्रामुख्याने पौराणिक-धार्मिक विषयांवरील देव-देवतांची चित्रे तर आहेतच; शिवाय महाभारत, रामायण, हरिवंश यांतील कथाप्रसंग चितारलेले आहेत. देवदेवतांच्या चित्रांमध्ये सरस्वती, महिषासुरमर्दिनी, लक्ष्मी, पार्वती, ॠद्धी-सिद्धी इत्यादी देवतांची तसेच श्रीकृष्ण, दत्तात्रय, शिव, विष्णू, ब्रह्मदेव, गणपती, राम आदी देवांची चित्रे आहेत. मात्र कालौघात यांतील बरीच चित्रे खराब व अस्पष्ट झाली आहेत, तर काही ठिकाणी पोपडे निघाले आहेत. काही जुने वाडे पडले किंवा पाडले गेल्यामुळे आजमितीस अने भित्तिचित्रे नष्ट झाली आहेत; तथापि त्यांतील काही चित्रकामाची सुरेख छायाचित्रे व्यासंगी संशोधकांनी घेऊन ठेवली आहेत.

मोतीबाग

वाईतील भित्तिचित्रासाठी प्रसिद्ध असलेली मोतीबागेतील हवेली ही एक सुंदर दुमजली इमारत सरदार आनंदराव रास्ते यांनी इ.स.१७८७ मध्ये बांधली. ही वास्तू सध्या उजाड असलेल्या उद्यानाच्या मध्यभागी आहे. या वास्तूचे नक्षीदार कलात्त्मक छत आणि स्तंभामधील जागा सुंदर भित्तिचित्रांनी अलंकृत केली आहे.पहिल्या मजल्यावरील दिवाणखान्यातील म्हणजे सभागृहातील बहुतांश भित्तिचित्रे आता अस्पष्ट व रंगहीन झाली आहेत.

दक्षिणेकडील छताखाली शीर्षपादापासून भिंतींवर सर्वत्र भित्तिचित्रे आढळतात. यांतील एका भित्तिचित्रात लोकनृत्यात तल्लीन झालेल्या दोन सुंदर युवतींचे (रागिणी हमवीरा) चित्र आहे. त्या दोघींनी एकमेकींच्या हातात हात  घातला असून  त्याच्या नजरा एकमेकींसमोर परस्परांच्या देहांवर खिळल्या आहेत. हातात हात घेतलेल्या या युवतींची मुरड काहीशी अनैसर्गिक असली, तरी लोभस आहे. अतिभंगातील त्याच्या छबीत  नृत्याच्या आविर्भावातील अंगविक्षेप, पदन्यास व पदलालित्य स्पष्ट दिसते. डावीकडील नृत्यांगनेचा गुडघ्यात वाकलेला केवळ पायाच्या बोटांवर टेकवलेला उजवा पाय आणि उजवीकडील नृत्यागनेचा गुडघ्यात वाकलेला पण घट्ट जमिनीवर रोवलेला डावा पाय याच्या हालचालीवरून त्यांच्या नृत्यातील गती जाणवते. त्यांच्या गळ्यातील उडणार्‍या पांढर्‍या ओढणी व वेण्या यांमुळे त्यांच्या गतिमानतेला चित्रकाराने आणखी बळकटी आणली आहे.डावीकडील सूरसुंदरीने अंगभर पांढर्‍या ठिपक्यांचा तांबूस रंगाचा पारदर्शक तलम घागरा घातला असून त्यातून तिची नितळ कांती विशेषतः भरदार मांड्या दिसतात. तिच्या स्तनांखाली एक पांढरी पट्टी दिसते. तद्ववत उजवीकडील सुंदरीच्या स्तनांखाली पांढरी पट्टी आहे. त्यांवरून त्या दोघींनी कंचुकी किंवा चोळी घातलेली असावी. उजवीकडील सुंदरीने तांबडा भडक रंगाचा पायघोळ घागरा घातला आहे. दोघींनी ओढणी डोक्यावरून घेतली असून त्यांतून त्यांचे काळेभोर केशकलाप दिसतात. धारधार नाक, काळेभोर लांब केस, धनुष्याकृती भुवया, नाजूक हनुवटी व प्रमाणबद्ध सुकोमल अंगकाटी ही या सुंदरीच्या सौंदर्याची प्रमुख लक्षणे असून गतिमानता हे या चित्राचे वैशिष्ट्य होय. तथापि या नृत्यांगनाच्या शरीराला दिलेली अवास्तव मुरड (वक्रता)आणि स्तनद्वय चिकटल्याप्रमाणे वाटतात. एकूण या लोकनृत्यात जोष असून या युवतींच्या मुद्रा, लाल रंग आणि पेहराव लक्षणीय आहेत. या चित्रावरील राजस्थानी प्रभाव रंगछटात व पेहरावांत दिसून येतो.

या नृत्यांगनांच्या  बाजूला एक बाल गजाननाचे चित्र आहे .बाल गजानन हा आपली माता पार्वतीच्या मांडीवरबसला असून दोन्ही हातानी तिचे स्तन पकडून दूध पीत आहे या त्याच्या तिसर्‍या हातात खेळणे आहे. पार्वती एका निळसर बिछान्यावर बसली आहे. तिच्या निळसर साडीच्या निर्‍या बैठकीवरलोळत आहेत.या ठिकाणी पार्वती एक रांगडी स्त्री वाटते. तिने डोक्यावरून पदर घेतला आहे. तिच्या समोर सुरूचे एक हिरवेगार  झाड आहे.

पश्चिमेकडील शीर्षपादावर पुन्हा एकदा गणपती, सरस्वती, छत्रपती शाहूमहाराज यांची   व्यक्तीचित्रे आढळतात. यांतील सरस्वती आपल्या नेहमीच्या आयुधांसह खुर्चीसारख्या आसनावर एका बाजूस बसली असून तिच्या समोरच्या बाजूस विष्णू व ब्रह्मदेव आहेत. तर डाव्या बाजूस किचिंत पाठीमागे गणपती व शंकर उभे आहेत. यांतील चारही देव समभंग आसनस उभे असून फक्त ब्रह्मदेव एका चौकोनी आसनावर (चौरंगावर)उभा आहे. या चित्रातील देवांच्या चेह-यां वरील सात्त्विक भाव स्पष्ट दिसतात. त्यांच्या हातांत आयुधे आढळतात.छत्रपती शाहूमहाराजांचे हे एक त्यांच्या भारत इतिहास संशोधन मंडळातील  चित्राशी साम्य दर्शविणारे व्यक्तिचित्र आहे. या चित्रात शाहू महाराज उभे असून त्यांच्या हातात ससाणा हा पक्षी आहे. आजूबाजूस बागेचा परिसर रंगविला असून बागेत सुरूसह विविध प्रकारची झाडे दाखवली आहेत. त्यांपैकी एका हिरव्यागार वृक्षावर एक कबूतर सदृश पक्षी स्थिरावण्यासाठी फडफड करीत असलेला दाखवला आहे. शाहूमहाराजांनी नक्षीदार केशरी रंगाचा पायघोळ अंगरखा घातलेला आहे;  मात्र त्यांच्या कमरेपासून वरचा छातीपर्यंतचा भाग अनावृत आहे. त्यांच्या डाव्या हातात ससाण्याला बांधलेल्या दोरीचे बिंडोळे आहे. पूर्वीच्या काळी पाळीव ससाण्यांचा शिकारीसाठी उपयोग करीत. त्याचेच  हे दृश्य असावे. शाहूमहाराजांचे काळेभोर केस खांद्यापर्यंत रुळत आहेत. या चित्रातील त्यांच्या मिशा, धारधार नाक आणि एकूण चेहरेपट्टी त्यांच्या (भा.इ.सं.मंडळातील)छबीशी  तंतोतंत जुळते; फक्त त्यांच्या इतरत्र  उपलब्ध असलेल्या व्यतिचित्रांत त्यांचे  खांद्यावर रुळणारे केस पांढरे आहेत.

मोतीबागेत वरील काही प्रमुख चित्रांव्यातिरिक्त सरदार, मंत्रपठण करणारा ब्राह्मण, हितगुज करण्यात  मग्न असलेले जोडपे, हुक्कापान करणारी महिला, फळे देणारा सेवक, गौळण वगैरे भिन्न प्रकारची व्यक्तिचित्रे आहेत. या विविध व्यक्तिचित्रांमधील गौळणीचे व्यक्तिचित्र लक्ष वेधून घेते. ते प्रमाणशीर अंगकाठी ,रंगसंगती, रेषांचे लालित्य आणि एकूण ढंग या दृष्टीने विशेष उल्लेखनीय आहे. या चित्रात नऊवारी कासोटा घातलेली पिवळी साडी चापूनचोपून नेसलेली, विविध दागिने घातलेली आणि दोन्ही खांद्यांवर दूध-दह्याची प्रत्येकी दोन पात्रे असलेली,कावड घेतलेली,तारुण्याने मुसमुसलेली गौळण झपझप पावले टाकत चाललेली आहे. तिच्या केशकलापात मोत्यांची बिंदी असून तिच्या नाकात नथ व कपाळावर मध्यभागी कुंकवाचा टिळा आहे. गळयाबरोबर एक अलंकार, बहुधा मोत्याचा कंठा व एक लांबसडक पुष्पमाला कमरेपर्यंत लोंबकळत आहे. ती तिच्या शारीरिक गिरकीमुळे भारदस्त नितंबांवर पडली आहे. तिच्या पिवळ्या साडीचा पदर काळा असून तिने तशीच काळी कंचुकी/पोलके/घातले आहे.तिच्या कावडीतीलदोन कुंभ वैशिष्टयपूर्ण रीत्या चितारलेले आहेत. हे एक अत्यंत वास्तव, प्रमाणशीर व स्त्री-सौंदर्याचे नेटके चितारलेले व्यक्तिचित्रण आहे. यात कटिभागाची-नितंबांची वक्रता बेमालूम साधली आहे.त्यामुळे या तरुणीस नितंबिनी म्हणजेच जास्त यथार्थ ठरेल!

 

 

मोतीबागेतील आरामगृहआतील चित्रांत विविध विषय हाताळले असून वाईतील अन्य वाड्यांतील चित्रांपेक्षा त्यांची स्थिती चांगली आहे बर्‍याच चित्रांचे रंगही फारसे फिकट वा अस्पष्ट झालेले नाहीत.एकूण मध्ययुगीन महाराष्ट्रातील मराठा भित्तिचित्रांच्या संग्रहांपैकी हा एक सर्वात मोठा

मूल्यवान खजिना असून त्यातील प्रकार आणि गुणविशेष इतरांपेक्षा नक्कीच सरस म्हणावे लागतील.

 

 

देववाडा(मधली आळी):-

मोतीबागेव्यतिरिक्त अन्य वाड्यांपैकी सध्या देवांचा म्हणून जो मधल्या आळीत वाडा आहे, ती वास्तू पूर्वी सवाई  माधवराव पेशव्यांच्या  सासर्‍याच्या मालकीची होती. तिचे बांधकाम इ.स.१७८०-८५ दरम्यान केव्हातरी झाले असून या वाड्याच्या दोन खोल्यांमध्ये भित्तिचित्रे सुस्थितीत होती;    परंतु कै.गोपाळराव देव यांनी तो वाडा विकत घेतल्यानंतर त्यांना नवीनीकरणाची इच्छा झाली. या चित्रांतील द्रोणागिरी उचलून नेत असलेल्या हनुमानाचे चित्र लक्षणीय आहे. तसेच दैत्याच्या वधाचे एक चित्र लक्ष वेधून घेते. तरी या  वाड्यात एक १० x १० ची खोली पूर्ण चित्रांनी सजलेली

असून लाल रंगाच्या पार्श्वभूमीवर चित्र चितारलेली आहे. पिवळा, निळा, हिरवा, लाल अशा गडद रंगांचा मनोहारी मिलाफ चित्रात दिसत असून,चित्रे पाहणार्‍याची नजर खिळवून  ठेवतात.

 

 

पटवर्धन वाडा(गंगापुरी)

गंगापुरीतील पटवर्धनवाड्याचे बांधकाम अठराव्या शतकात झाले आहे. या दुमजली इमारतीत वरच्या मजल्यावरील खोलीत काही भित्तिचित्रे आहेत. त्यात गोपीवस्त्रहरण, कालियामर्दन, माखनचोर कृष्ण, शेषशाही विष्णू, परशुराम कंसाचा वध करणारा कृष्ण हे कथाविषय चितारलेले आहेत. श्रीकृष्णलीलांमधील कालियादमन या दृश्यचित्रसमूहात कृष्ण कालियाच्या मस्तकावर (फण्यावर) उभा असून कालियाच्या पत्न्या(नागिनी) आपल्या पतीला जिवंत सोडून द्यावे, म्हणून विनंती

करण्यास आल्या आहेत. आणि त्या सभोवती जमल्याचे करुणास्पद चित्रण आहे. याशिवाय

विष्णूचे दशावतार आणि रामपंचायतन  यांबरोबरच काही कृष्णलीलांचे चित्रीकरण आढळते. यांमध्ये गोपिकांबरोबर रंग खेळणारा कृष्ण व राधा, गोवर्धनधारी कृष्ण वगैरे काही चित्रविषय आहेत. गोवर्धनधारी कृष्ण या चित्रात श्रीकृष्ण करंगळीच्या आधारावर पर्वत पेलत असून त्याच्याखाली

गोपगोपींसह अन्य नागरिकही आश्रयास आलेले दाखवले आहेत. उत्तरेकडील व पश्चिमेकडील भिंतींवर पुन्हा कृष्णलीला, सीतेकडे भीक मागणारा  भिक्षुकाच्या  वेशातील रावण,  रावण-जटायू युद्ध, शिव-पार्वती  दांपत्य व समुद्रमंथन हे विषय हाताळले आहेत. त्यांतील समुद्रमंथनाचे चित्र विशेष उल्लेखनीय म्हणावे लागेल. हे  चित्र उभट असून हे तीन भागांत विभागलेले आहे. अगदी खालच्या भागात समुद्राचे म्हणजे विशाल जलसागराचे निळसर रंगात रेखाटन केले असून त्यात जलचर दर्शवले आहेत. त्यासोबत कूर्म अवतार चितारला आहे. मधल्या भागात चित्राच्या मध्यभागी मेरू पर्वताच्या साहाय्याने (या ठिकाणी मेरू पर्वत हा मुसळाचे काम करतो)देव आणि दानव वासुकीच्या  मदतीने मंथन करीत आहेत, हे दृश्य चित्रित केले आहे. ही अगदी वरच्या म्हणजे पहिल्या भागात समुद्रमंथनातून निघालेली विविध रत्ने त्यात चित्रित केली आहेत. ही   चौदा रत्ने जशा क्रमाने समुद्रातून बाहेर आली,  त्या क्रमानुसार चित्रित केली आहेत. या चित्रसमूहात देवतांच्या चेहर्‍यावरील सात्त्विक भाव आणि दानवांच्या चेह-यावरील तामसी भाव चित्रकाराने हुबेहूब

चितारलेले आहेत.

 

जुना रास्तेवाडा (शासकीय मुद्रणालय)  :-

गंगापुरीतील जुना रास्तेवाडा(विद्यमान शासकीय मुद्रणालय) आणि रविवार पेठ  यात पूर्वी बर्‍यापैकी भित्तिचित्रे असावीत असे म्हणण्या इतपत (अवशेष मिळतात वा) खुणा दिसतात. रास्ते वाड्यास १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात क्रांतिकारकानी  आग लावली.त्यात त्या वाड्यातील लाकडी बांधकाम पेटून मूळ वाड्याचे विद्रूपीकरण झाले.त्यात बरीच भित्तिचित्रे नष्ट झाली.त्यामुळे आज तिथे काही नाजूक फुलांचे रचनाबंध,फुलदाण्या यांचीच सुशोभनासाठी अलंकरण म्हणून रेखाटलेली चित्रणे आढळतात;मात्र कोठावळे यांच्या वाड्यात जनकराजाच्या रामपंतन या भित्ति चित्रांशिवाय काही फुलझाडे आणि गुलदस्ता यांचीच भित्तिचित्रे अवशिष्ट आहेत.या शिवाय काही भौमितिक आकृतिबंधांचे चित्रीकरण आढळते.दोन्हीकडील फुलदाण्यांच्या चौकटीभवती सुरेख नक्षीकाम आहे.शिवाय फुलदाणीच्या वरच्या बाजूस महिरप आहे.

 

 

चुनेगच्चीतील (संदला-शिल्पन)मूर्तीकला.

चुनेगच्चीतील संदला शिल्पन/अलंकरण/ही कला-संकल्पना वास्तुसजावटीसाठी प्राचीन काळापासून देशात प्रचारात व कृतीत असल्याचे ऐतिहासिक दाखले मिळतात. प्रथम ग्रीक संस्कृतीत (इ.स.पू.पाचव्या-चौथ्या शतकांत)उत्थित शिल्पांकनासाठी चित्रणपूर्व आवरणासाठी चुनेगच्चीचा वापर केलेला आढळतो. ग्रीकांची ही कला पुढे रोमनांनी आत्मसात करून प्राचीन रोमन वास्तूकारांनी भव्य स्मारकवास्तूंच्या विटांच्या भिंतीवर चुन्याचा गिलावा देऊन त्यावर उठावशिल्पे खोदली. तत्कालीन थडग्यांवरही विस्तृत प्रमाणात चुनेगच्ची अलंकरण आढळते. अलेक्झांडर द ग्रेट(इ.स.पू.३५६-३२३)या सम्राटाच्या भारतावरील स्वारीनंतर अफगाणिस्तान व गांधार देशांत ती ग्रीकांश संस्कृतीद्वारे प्रविष्ट झाली. अफगाणिस्तानातील अनेक बौध्द मठांमध्ये गांधारकलेच्या निदर्शक असलेल्या ग्रीक बौध्द शैलीतील चुनेगच्ची वास्तुशिल्प-सजावटीचे विपुल नमुने आढळतात. कनिष्ठ (पहिले शतक) आणि त्याच्या वारसांनी या चुनेग्च्चीतील संदला-शिल्पनाला उत्तेजन दिले. अलेक्झांडरच्या स्वारीनंतर रोमनांनी भारतात चंचूप्रवेश केला. गांधारकलेतील ग्रीको-रोमन प्रभाव स्पष्ट दर्शविणारी चुनेगच्चीतील अनेक शिल्पे पेशावर जिल्ह्यात आणि त्यांच्या परिसरात पहावयास मिळतात; मात्र दक्षिण भारतात या कलेला निश्चितपणे केव्हा सुरुवात झाली, याविषयी एकमत नाही. पेशव्यांनी आपले अन्य कारभारी-वकील हैद्राबाद (आंध्रप्रदेश) (तामिळनाडू) व कर्नाटक या भागात ठेवले होते. रास्ते, पटवर्धन, पेठे वगैरे सरदारांनी आपल्याबरोबर दक्षिणेकडील पाथरवट, कारागीर व कलाकार महाराष्ट्रात आणले. त्यांच्यामुळे महाराष्ट्रात संदला-शिल्पन किंवा चुनेगच्चीतील मूर्तिकाम प्रविष्ट झाले. मराठाकालीन मंदिराच्या शिखरांवर व प्रासादांतून चुनेगच्चीच्या या मूर्तिकलेचा आविष्कार एकोणिसाव्या शतकाअखेर पहावयास मिळतो. दक्षिण भारतातील गोपुरांच्या प्रभावातून निर्माण झालेली ही कला पुढे मध्यप्रदेशात अहिल्याबाई होळकर या साध्वी राणीने बांधलेल्या इंदूर, महेश्वर, उज्जैन इत्यादी ठिकाणांच्या छत्र्या व मंदिरांतूनही आढळते. या शिखरांवरील अलंकरणास ‘ विमान देवता ’ म्हणतात आणि त्या प्रामुख्याने देवकोष्ट म्हणजे शिखरांवरील कोनाड्यांतून आढळतात.

महाराष्ट्रातील  मराठा  वास्तुविशारदांनी दक्षिण  हिंदुस्तानातील द्रविड  मंदिरशैलीतील गोपुरांचे  अनुकरण व नक्कल  मध्ययुगीन  मराठा मंदिराच्या शिखर बांधणीत केली. वाईतील मंदिरातील  शिखरांची वास्तू सजावट, नक्षीयुक्त अलंकरण, चुनेगच्चीतील मूर्तीची निर्मिती हे त्याचे उत्तम उदाहरण असून वाईतील सुमारे वीसएक मंदिरातील शिखरांवरील कोनाडे किंवा देवकोष्टातून  चुनेगच्चीतील मूर्ती आढळतात. सांख्यिकीय दृष्ट्या महाराष्ट्रातील मराठकालीन चुनेगच्चीतील मूर्तीचा विचार करता वाईतील अशा मूर्तींच्या संख्या निश्चितच लक्षणीय आहे व सुरेख आहेत . अशा मूर्तींची बरीच पडझड कालौघातात झाली आहे. काही मूर्ती फुटल्या आहेत. काहींचे हवामांनामुळे विरुपीकरण झाले आहे. तथापि काशीविश्वेश्वर, हरिहरेश्वर, बाणेश्वर, महालक्ष्मी, ढुंड़िविनायक मंदिर, वाकेश्वर, वगैरे काही मंदिराच्या शिखरांतून अद्यापि अनेक मूर्ती सुस्थितीत  अवशिष्ट असून काशीविश्वेश्वर मंदिरावर किमान पन्नासएक मूर्ती सुस्थितीत आढळतात. या मूर्तिसंभारात दशावतार ऋषिमुनी, महिषासुरमर्दिनी, गणपती ,सरस्वती, शेषशायी विष्णू , गोपालकृष्ण, राधा-कृष्ण, राम, सीता, लक्ष्मण, मारुती, दत्तात्रेय, शिव वगैरे देवदेवतांच्या प्रमुख्याने पौराणिक-धार्मिक मूर्तीना प्राधान्य दिलेले असून धर्मातील अशा फार कमी मूर्ती आहेत. धर्मातील मूर्तीत मुख्यत्वे नृत्यांगना, पुत्रवल्लभा, मिथुन , शिल्पे, शिपाई, सेनापती, सरदार, दम्पत्तीप्रतिमा, संगीतकार, वीणावादक वगैरेंच्या मूर्ती आढळतात.

 

महालक्ष्मी मंदिर

 

धर्मपुरीतील महालक्ष्मी मंदिर हे महालक्ष्मीच्या उत्कृष्ट पाषाणमूर्तीसाठी प्रसिद्ध असून ते वाईतील आकाराने सर्वात मोठे मंदिर आहे .या मंदिराचे मूळ शिखर पंचस्तरीय (एकावर एक मजले असलेले ) आहे आणि त्यावर चुनेगच्चीतील मूर्तीसाठी सुमारे साठ कोनाड्यांची रचना केली आहे .प्रत्येक स्तरावर पुन्हा चारी बाजूंस लहान शिखरे आहेत. त्यांतून सुमारे चाळीस कोनाडे आहेत.ते ज्या वेळी म्हणजे इ .स.१७७४ मध्ये बांधून पूर्ण झाले, त्या वेळी त्याच्यावर निश्चितपणे शंभरएक मूर्ती सुस्थितीत असणार,यात संदेह नाही; मात्र आज जेमतेम सुमारे २४-२५ मूर्ती कशाबशा तग धरून आहेत आणि त्यांतील हाताच्या बोटांवर मोजण्याइतपतच सुस्थितीत आहेत.यांतील उर्वरित मूर्ती हवामानामुळे कालौघात खराब झाल्या वा पडून गेलेल्या आहेत. त्यांपैकी गणपती, सरस्वती,शेषशायी विष्णू,लक्ष्मी वगैरे काही उल्लेखनीय होत.यांतील सरस्वतीची,मूर्ती अन्य सरस्वतींच्या मूर्तींहून भिन्न असून ती द्विभुज आहे.उत्तरेकडील शिखरावर ही मूर्ती उत्तराभिमुख असून या ठिकाणी देवी मोर या तिच्या पारंपारिक वाहनावर एका बाजूस ललितासनात बसली आहे.तिच्या उजवीकडे मोराचे तोंड आहे आणि त्या बाजूलाच मोराचा पिसारा आहे.मोराची चोच तुटलेली आहे;मात्र त्याचा दिमाखदार पिसारा व तुरा स्पष्ट दिसतो .देवीच्या उजव्या मांडीवर वीणेचा भोपळा असून उजव्या हाताने ती तारा छेडीत आहे आणि डाव्या हाताने ती स्वरांवर नियंत्रण करीत असावी,असा आभास या मूर्तीत निर्माण केला आहे .दोन्ही हातांत वीणा तिने अशा रीतीने व padhyपध्दतीने धारण केली आहे की ,जणू ती त्यातून धून काढीत आहे .तिची केशभूषा अन्य सरस्वतींप्रमाणेच साधी असून तिने  अंबाडा घातलेला आहे .काशीविश्वेश्वर मंदिरातील शिखरावरील मूर्तीप्रमाणेच हिच्या अंगावर मोजके दागिने आहेत .त्यांतील कर्णफुले, गळ्यातील जाड मोत्यांचा कंठा, हातांतील भूषणे(कंकणे) आणि बाहूंतील बाजूबंद हे अलंकार स्पष्ट दिसतात.तिने साडीसारखे अधोवस्त्र नेसले असून त्यांच्या चुण्या मांड्यांवर स्पष्ट दिसतात.वाईतील चुनेगच्चीतील चार –पाच सरस्वतीच्या मूर्तींपैकी ही अधिक सुबक आणि प्रमाणबद्ध  अशी साच्यात घडविलेली मूर्ती  असून तिच्या चेहेर्‍यावर स्मितहास्य आहे .

या सरस्वतीच्या मूर्तीच्या शेजारील कोनाड्यात  एक सुरेख शेषशायी विष्णूची मूर्ती आहे. एकूण   वाईतील चुनेगच्ची मूर्तींच्या संग्रहात शेषशायी विष्णूच्या दोन-पाच  मूर्ती आढळतात.त्यांतील ही एक सुबक  व लक्षणीय मूर्ती आहे.येथे विष्णू चतुर्भुज आहे आणि शेषावर निर्धास्त टेकून बसला असून त्याने डावा पाय उजव्या मांडीवर  ठेवला आहे. लक्ष्मी त्याचा पाय चुरत आहे.विष्णूने उजव्या  हाताने  आपल्या  मानेला  आधार दिला आहे.त्याच्या दुसऱ्या उजव्या हातात पद्-म आहे. त्याच्या दोन्ही डाव्या (वरच्या -खालच्या )हातात अनुक्रमे चक्र व गदा आहे.त्याच्या बेंबीतून ब्रह्मदेव वर आलेला दर्शविलेला आहे .त्याची आकृती ही प्रतीकात्मक  एक किरकोळ मूर्ती आहे.या ठिकाणी विष्णूच्या चेहर्‍यावर निवान्तपणाचा आविर्भाव असून लक्ष्मी ही एक आज्ञाधारक सेविका वाटते.