इतर देवस्थाने

उमामहेश्वर (पंचायतन शैली)

गंगापुरीत उमामहेश्वर हे पंचायतन उपशैलीतील मंदिर आहे. त्याला सभागृह व गर्भगृह असून त्याची बांधणी मुस्लिम वास्तुशैलीशी साधर्म्य दर्शवितो. या मंदिरातील सभामंडपात भित्तिचित्रे आहेत. ती दगडी भिंतीवर काढली आहेत आणि खडबडीत पृष्ठभागावर चितारलेली आहेत. त्यामुळे त्यांवरील रंग अस्पष्ट झाले आहेत. ती कालौघात जवळजवळ नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. या मंदिराच्या चारी कोपर्यात डावीकडून अनुक्रमे विष्णु,लक्ष्मी ,गणपती आणि सूर्य यांची छोटी मंदिरे आहेत. त्यामुळे या मंदिरास पंचायतन उमामहेश्वर मंदिर म्हणतात.मंदिराला चोहोबाजूंनी प्राकार असून समोर नंदीची काळ्या पाषाणातील सुबक मूर्त्ती आहे. सभोतीच्या मंदिरांतील छोट्या पण संगमरवरी पाषाणातील मूर्त्ती प्रमाणबद्ध असून लक्षणीय आहेत.

हरिहरेश्वर मंदिर

धर्मपुरीत साठे धेर्मशाळेच्या रस्त्यावर हेमाडपंती शैलीत बांधलेले हरिहरेश्वराचे जुने मंदिर आहे. हे मंदिर भिकाजी नाईक रास्ते यांनी अठराव्या शतकाच्या पूर्वार्धात बांधलेले असून या मंदिरास पेशव्यांनी वाईच्या शिवारातील सुमारे १२०० रुपये उत्पन्नाची जमीन इनाम म्हणून दिली होती . या मंदिराचा गाभारा दगडी असून लहानसा दगडी मंडप आहे. त्यापुढे लाकडी मोठा मंडप आहे. मंदिराच्या गर्भगृहाच्या बाहेरील भिंतीवर काही पाषाणशिल्पे असून लाकडी सभागृहाच्या पुढील नंदीची पाषाणातील बैठी मूर्ती लक्षणीय आहे.

याही मंदिराचे शिखर काहिसे कशीविश्वेस्वराप्रमाणे असून त्यावरील चुनेगच्चीतील मूर्ती सुस्थितीत आहेत. पद्मासनात बसलेल्या एका साधकाची मूर्ती फार छान आहे . ती प्रमाणबद्ध असून त्यात साधकाचे गुणविशेष आढळतात.

जुन्या कृष्णा पुलाच्या पश्चिमेस नदीपात्रात चार –पाच मंदिरे आहेत. त्यातील त्रिसुलेश्वर मंदिर गर्भगृह व सोपा अशा लहानशा दोन दालनात विभागले असून मर्ढ येथील गोळे यांनी ते अठराव्या शतकाच्या अखेरीस किंवा एकोणिसाव्या शतकाच्या पाहिल्या दशकात बांधले असावे, असे शैलीकारानापासून वाटते. या मंदिराचे शिखर अन्य शिखरांपेक्षा वेगळे, वैशिष्टपूर्ण व कलात्मक आहे. त्याची रचना मोठ्या कुंभावर लहान कुंभ अशी उतरंडीची असून एका उत्फुल्ल कमलावर सुरवातीस कुंभ , त्यावर पुन्हा उत्फुल्ल कमळ व कुंभ आणि अगदी वरती उपडे कमळ असून त्याखाली हि-याच्या नक्षीची वर्तुळाकार बांगडीसदृश रचना आहे, आणि त्यावर पुन्हा कुंभ व कळस अशी शिखराची अत्यंत आकर्षक व चित्तवेधक रचना केली आहे . अशाच प्रकारचे शिखर रामडोह आळीतील कृष्णाकाठी किंबहूना पात्रात बांधलेल्या रामेश्वर मंदिराचे आहे.या रामेश्वर मंदिराच्या शिखरावर खालच्या बाजूस भित्तीचित्रे असून त्यात दशावतार चितारले होते. तसेच काही कोनाड्यांतून मूर्तीअएवजी सुरेख जाळीकाम आहे. त्यामूळे या शिखराला एक वेगळे स्वरूप प्राप्त झाले आहे.

हरेश्वर मंदिर

धर्मपुरीतील हरेश्‍वर मंदिराच्या त्रिस्तरीय शिखरातील कोनाड्यांत सुमारे २४ मूर्ती अवशिष्ठ असून त्यापैकी दहा –बारा सुस्थितीत आहेत .या मूर्तींत शिवाच्या मूर्ती जास्त आहेत. या शिखराचे बांधकाम सवाई माधवराव पेशव्यांच्या कारकिर्दीत (कार.१७७४-१७९५)अठराव्या शतकाच्या अखेरीस झाले आहे .

या मूर्तिंसभांरातील दक्षिणेकडील सर्वात खालच्या स्तरातील एक दक्षिणाभिमुख तपोनिष्ठ साधकाची मूर्ती असून ती विलक्षण सुंदर आहे.या ठिकाणी साधक पद्-मासनात बसला असून त्याची अंजलीमुद्रा कोणत्यातरी योगिक आसनातील क्रिया दर्शविते .तो आपल्या चिंतनात एकाग्र झाला आहे,हे स्पष्ट दिसते. त्याने दुटागी धोतर नेसले असून त्याचे कमरेच्या वरील शरीर उघडे आहे.त्याने डोक्यावर मुकुट घातला आहे. त्याच्या कानातील भिकबाळी,करभूषणे आणि पायांतील तोडे आदी अलंकार तो अमिर–उमराव घराण्यातील असावा, हे दर्शवतात. या सर्व मूर्तीत त्याच्या आकडेबाज भारदस्त मिशा लक्ष वेधून घेतात. त्याच्या मुद्रेवरील नैसर्गिक भाव चैतंन्याचे घोतक आहे.

रामेश्वर मंदिर

राम डोह आळीत वास्तुशैलीच्या दृष्टिकोनातून पाहता पेशवेकाळातील दोन सुरेख मंदिरे आहेत. त्यांपैकी रामेश्वराचे मंदिर आणि त्याच्या दक्षिणेस असलेले रामकुंड वाईच्या धार्मिक जीवनात अत्यंत पवित्र मानले जाते. दर बारा वर्षांनी रामेश्वर मंदिरातील गर्भगृहाच्या स्वयंभू पिंडीच्या डाव्या बाजूने (म्हणजे पूर्वाभिमुख मंदिरात आपल्या उजव्या बाजूने)भागीरथी उगम पावते.तिचे पाणी नदीला वाहून जाण्यासाठी पिंडीच्या खड्यात एक छिद्र आहे. या मंदिराचे शिखर त्रिशुलेश्वाराच्या शिकाराप्रमाणे उत्फुल्ल आहे. हे मंदिर पंत देशपांडे यांनी इ.स .१७४२ मध्ये म्हणजे पूर्वपेशावाईत बांधले आहे. या मंदिरावर उत्तरेकडील राजस्थानी वास्तुशैलचा प्रभाव प्रकर्षाने जाणवते.

मंदिराची बांधणी नवयादव हेमाडपंती वास्तुशैलीत असून गर्भगृह व सभामंडप या दोन दालनांत त्याची विभागणी झाली आहे. सभामंडपात दगडी स्तंभ असून पश्चिमेकडून तो पूर्णतः उघडा आहे. त्यासमोर उघड्या पाषाणात खोदलेली नंदीची सुरेख बैठी मूर्ती आहे. तिच्या गळ्यात व अंगावर माळा खोदलेल्या असून नंदीचे तोंड फुटलेले आहे. वाईतील सर्वं मंदिरांच्या शिखरांमध्ये हे शिखर उठून दिसते. हे शिखर चतुष्कोनांत तीनस्त रांत आकाशाकडे झेपावलेले आहे.यामुळे या शिखरास एक वेगळेच अभिनव वैभव प्राप्त झाले आहे. या शिखरावर सुमारे ऐंशी मूर्ती बसवलेल्या होत्या.सर्व मूर्ती आकाराने उभट असून उंच शरीराला एक स्वाभाविक सुंदरता लाभली आहे. या मूर्ती खराब झालेल्या आहेत.

गोविंद रामेश्वर मंदिर

काशीविश्वेश्वर मंदिराच्या नगारखान्यासमोरच सुमारे तीसपस्तीस मीटरवर (शंभर - सव्वाशे फुटांवर) गोविंद –रामेश्वराचे पूर्वाभिमुख मंदिर आहे .यावर ते सुस्थितीत असताना सुमारे ३२ मूर्ती होत्या आणि काही वर्षापूर्वीपर्यंत(२००३-२००४) त्या कशाबशा तग धरून होत्या ;पण अलीकडे नूतनीकरण व रंगकाम या प्रक्रियेत यांतील बहुसंख्य ठिसूळ झाल्यामुळे काढून टाकण्यात आल्या आहेत; पण त्या मूर्तीतील पूर्वाभिमुख मधोमध एक गजाननाची सुरेख मूर्ती व त्याजवळची आणखी एक मूर्ती अद्याप अवशिष्ट असून त्यांतून उर्वरित मूर्तींच्या घडणीची कल्पना येते .शिवाय इतर मंदिरांवरील प्रतिमानांत आढळणांर्‍या सरदार ,सैनिक, संगीतकार इत्यादीच्या काही मूर्तीबरोबर या मंदिराच्या शिखरांवरील सरस्वतीदेवी व एक सैनिक या दोन मूर्ती विशेष लक्षवेधकं व उल्लेखनीय होत्या .गजाननाच्या उजव्या बाजूस सरस्वतीची मूर्ती आग्नेयेकडे तोंड केलेली ,मोरावर बसलेली चतुर्भुज असून तिने आपल्या पुढच्या दोन हातांत वीणा धारण केला आहे. या ठिकाणी मोर फारसा नैसर्गिक वाटत नाही .तिने नक्षीदार कर्णफुले घातली असून तिची कंकणे मोत्याचीच आहेत .पायात पैजण व गळ्यात लांब रत्नहार आहे.तिच्या मस्तकावर मुकुट नाही;तर साधी भांग पाडलेली केशभूशा दिसते.तिचे मागचे दोन हात बाहूपाशी तुटले असले,तरी तिच्या हाताच्या तळव्यात अनुक्रमे पुस्तक व अक्षमाला आहे .देवीच्या मागे प्रभावळीसारखा मोराचा पिसारा पसरला आहे .काशीविश्वेश्वरातील मूर्तीप्रमाणेच तिची घडण होती .

याच मंदिराच्या शिखरावरील ईशान्य कोपर्‍यातील सर्वात वरच्या कोनाड्यात एका सैनिकाची त्वेषपूर्ण आविर्भावातील मूर्ती असून त्याच्या डाव्या हातात ढाल आहे आणि उजव्या हातात तलवारीसारखे शत्र आहे; परंतु उजवा हात कोपरापासून खांद्यापर्यत तुटलेला आहे .त्यामुळे तलवार अस्पष्ट दिसते.त्याचा प्रवित्रा मात्र सैनिकाचा त्वेष आणि लढण्यासाठी सज्ज झालेला आविर्भाव दर्शवितो.त्याने पेशवेकालीन पगडी घातली असून ती मुकुटसदृश आहे.त्याचे उतरीय वस्त्र बाराबंदी अंगरख्यासारखे असून अधोवस्त्र धोतराप्रमाणे घोळदार आहे; कारण त्याच्या तीन चुण्या स्पष्ट दिसतात. त्याने कानांत भिकबाळी घातली असून त्याच्या चेहर्‍यावरून तो अगदी विशीच्या आतील तरूण असावा;तथापि या सर्व मूर्ती आता काळाच्या पडद्यामागे गेल्या आहेत .

भद्रेश्वर मंदिर

वाईच्या पूर्वेस नदीच्या उत्तर काठावर फुलेनगरला लागून भद्रेश्वराचे जुने पेशवेपूर्व काळातील हेमाडपंती शैलीतील शिवमंदिर आहे. ते उंचावर बांधलेले आहे.त्यासमोर नंदीची मूर्ती आहे. गर्भगृहात स्वयंभू पिंड आणि त्यावर शाळीग्रामाची शाळुंका असून गाभाऱ्याचे छत घुमटाकार आहे. गणेशपट्टीवर मधोमध गणपतीची मूर्ती खोदलेली आहे.सभामंडप बंदिस्त असून त्यात अंधार आहे. मंदिराचे शिखर रास्तेकालीन मंदिरापेक्षा अगदी भिन्न व वैशिष्टयपूर्ण आहे.त्यावर मूर्तींसाठी स्वतंत्र देवळ्या नाहीत. शिखराचे पूर्ण बांधकाम चुना आणि विटांमध्ये केलेले आहे. शिखर सामोच्च्ता दर्शक रेषांनी वर निमुळते होत गेलेले आहे. त्याचा आभास दुरून वेणीच्या पेडांप्रमाणे भासतो.

रेषांच्या लालीत्यमय कोरणीमुळे त्याची बांधणी आकर्षक व वैशिष्ट्यपूर्ण झाली आहे .शिखराला पितळी कळस आहे.या मंदिरासमोर चौंड्यांच्या मालकीचे इ.स.१९०४ मध्ये बांधलेले राम मंदिर आहे.त्यात रामाबरोबर सीता व लक्ष्मण यांच्याही मूर्ती आहेत.

वाकेश्वर मंदिर

भद्रेश्वर मंदिराच्या थोडे पुढे बावधन घाटावर कृष्णा नदीच्या दक्षिण काठवत वाकेश्वरचे प्राचीन मंदिर आहे. कालदृष्ट्या हे मंदिर यादोत्तर काळातील परंतु शिवपूर्व काळातील असून शिखर मात्र उत्तर पेशवेकाळात विटा व चुना या माध्यमात बांधले आहे.शिखरावर मूर्तिकामासाठी कोनाडे असून त्यातील चुनेगच्चीतील काही मूर्ती सुस्थितीत आहेत. हेमाडपंती मंदिरात होणारी सर्व वास्तूवैशिष्ट्ये आढतात.या मंदिराभोवती दगडी तटबंधी आहे. मंदिराचे विधान चांदणीच्या आकाराचे असून शिखरावर लहान शिखर आढळून येत नाही.

बाणेश्वर मंदिर

वाईतील बाणेश्वर मंदिर हे अन्य मंदिरांच्या रचनाकल्पाहून वेगळे व वैशिष्ट्यपूर्ण आहे.त्याचे शिखर प्रेक्षणीय व लक्षणीय असून त्यावर सर्वत्र चुनेगच्चीतील भरगच्च मूर्तिकाम आहे.त्यावर मूर्तींसाठी सुमारे ऐंशी कोनाडे आहेत व या कोनाड्यांच्या मधल्या जागेतही चुनेगच्चीतील मूर्ती बसविलेल्या आहेत. यांतील बहुसंख्य मूर्ती फुटलेल्या व ठिसूळ झालेल्या असून हाताच्या बोटांवर मोजण्याइतपतच थोड्याबहुत सुस्थितीत आहेत. पश्चिमाभिमुख मंदिराच्या वरच्या बाजूस मधोमध विष्णूची मूर्ती आहे.त्याच्या बाजूच्या छोट्या कोनाड्यांत दोन्ही बाजूंस चामरधारी स्त्री-प्रतिमा आहेत.तसेच दक्षिणेकडील एका कोनाड्यात मारुतीची मूर्ती आहे .याशिवाय वरच्या कुंभाखाली दशावतारातील विष्णूच्या मूर्ती आहेत.पडझड झाल्यामुळे या मंदिरावरील मूर्तीचे अलंकार ,वस्त्रे ,वाहने इत्यादींचे तपशील स्पष्ट दिसत नाहीत.तथापि देवदेवतांच्या मूर्तींबरोबरच या मूर्तिंसंभारात एक महिषासुरमर्दिनीची जीर्णशीर्ण अवस्थेतील मूर्ती आहे.ही षड षड्भुजादेवी पुढील दोन हातांत त्रिशूळ धरून तो महिषराक्षसाच्या मानेत खुपसत आहे. तिने उजवा पाय महिषाच्या पाठीवर मागील बाजूस ठेवला आहे. उर्वरित चार हातांच्या फक्त अर्धवट खुणा दिसतात.देवीने करंडमुकुट धारण केला असून तिच्या उग्र चेहर्‍यावरील बटबटीत डोळे स्पष्ट दिसतात. तिच्या कानात भोकरे असून तिच्या मानेमागे नशीदार प्रभावळ आहे. या मूर्तीच्या दोन्ही बाजूंस चुनेगच्चीतील स्तंभ असून चेहर्‍याभोवती कलात्मक महिरप व त्यावर भौमितिक आकृतिबंधात नक्षी काढलेली घुमटाकार मेघडंबरी आहे .तिच्या देव्हार्‍याबाहेरच्या बाजूस तिच्या दोन सेविका-बहुधा चवरीधारी असाव्यात.या संदला-शिल्पाची खूप मोडतोड व खराबी झाल्यामुळे त्यातील तपशील स्पष्ट दिसत नाहीत.

या शिल्पसमूहात दोन्ही हात कमरेवर ठेवलेली एक विठठ्लाची मूर्ती, जी इतरत्र क्वचित दिसते, ती सर्वात वरच्या थरात एका उरुशुंगाखाली (लहान शिखराखाली ) असून इथे विठ्ठल समभंग आसनात धोतर नेसून उभा आहे .त्याच्या कमरेवरील भाग अनावृत आहे; पण माथ्यावर पगडीसदृश मुकुट आहे.या मूर्तिसंभारात एक अग्नीची मूर्ती असून अग्नी त्याच्या बोकड किंवा मेंढा या वाहनावर आरूढ झाला आहे. अग्नीच्या दोन हातांपैकी एकात अक्षसूत्र आहे .तथापि मूर्ती फुटलेली असल्यामुळे अन्य तपशील स्पष्ट दिसत नाहीत .या अग्नीच्या उजव्या बाजूस एका धष्टपुष्ट पुरुषाची आकृती आहे. बहुधा ही मारुतीची मूर्ती असावी,असे त्याच्या आविर्भावावरून वाटते .बाणेश्वरच्या शिखरावरील कोनाड्यांवरील अर्धकमान नक्षीने चितारलेली –रंगविलेली असून त्यावर सुरेख मेघडंबरी आहे.

बाणेश्वरच्या शिखरावरील मूर्तीचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे सर्व मूर्ती आकाराने उभट आहेत. उंच शरीराला स्वाभाविक सौंदर्य लाभते:परंतु या मूर्तींचा उभटपणा केवळ या कारणाने उद्-भवला असावा,असे वाटत नाही;कारण सबंध वास्तूच्या शरीराची मांडणीच उर्ध्वगामी-उभट आहे,हे स्पष्ट दिसते आणि ऊर्ध्वगामी गतीला उंचीला पोषक अशाच रीतीने सर्व मंदिराची रचना व अंगोपांगे सजविली आहेत. त्यामुळे मूर्तीचा उभटपणा या सर्व घटकांस साह्यभूत ठरला आहे. इतकेच काय, येथील प्राण्यांच्या,विशेषतः हत्तीच्या अलंकारणातही तो प्रकर्षाने जाणवतो.

काळेश्वर मंदीर

ब्राह्मणशाहीतील काळेश्वर मंदिरावरही चुनेगच्चीतील मूर्तीसाठी सुमारे २४ कोनाडे आढळतात:मात्र त्यांतील हाताच्या बोटांवर मोजता येतील एवढ्या कोनाड्यांत मूर्ती आढळतात. ह्याही जीर्णशीर्ण अवस्थेत आहेत;मात्र या मंदिराच्या मागील बाजूस शिखराखाली अप्रतिम जाळीकाम असून कोनाड्याभोवतीची चौकटही नक्षीदार आहे. ह्यात वैविध्य असून कमल व कलिका यांचा रचनाबंध सुरेख रीत्या गुंफला आहे. एवढेच नव्हे, तर प्रमुख अमलकाखाली/उत्फुल्ल कमळाखाली/आयताकार चौकोनी पट्टीत व त्याखालीही नक्षी आढळते. एकूण काळेश्वरच्या सर्वच कोनाड्याभोवती काशीविश्वेश्वराप्रमाणे नक्षीदार चौकट असून ती आबाशाई रंगाने रंगवलेली आहे. यात प्रामुख्याने कमळाचे रचनाबंध विशेषत्वाने आढळतात. दोन कोनाड्यांत मधे प्रत्येकी तीन कलात्मक चुनेगच्चीतील कुंभांची उत्तरंड आहे.त्यामुळे कोनाड्यातील मूर्तींस साहजिकच उठाव मिळतो. वरील मूर्तींव्यतिरिक्त या मंदिरात काही नर्तिका,संगीतकार व शृंगारशिल्पे आहेत. अशाच प्रकारचे जाळीकाम धर्मपुरी घाटावरील रामेश्वर मंदिरात आढळते. त्या ठिकाणी पाद्शीर्षावर दशावतार चितारलेले होते:पण त्यांचे अस्पष्ट अवशेष दिसतात.

शिखरांवरील चुनेगच्चीतील मूर्तींचा सर्वागींण आढावा घेतला असता या सर्वेक्षणातून तत्कालीन रूपणकलेविषयी काही ठळक गोष्टी निदर्शनास येतात.तसेच मराठा संस्कृतीची वैशिष्ट्ये दृग्गोचर होतात. या मूर्तिसंभारात द्शावतारासह अनेक देवदेवतांच्या मूर्तींना प्राधान्य देण्यात आले आहे. तथापि समुद्रमंथन, रामसीता स्वयंवर,कृष्णलीला अशा प्रकारचे कथात्मक प्रसंग कुठेच घडविलेले वा निर्दिष्ट केलेले आढळत नाहीत: कारण या सर्व मूर्ती साच्यात घडविलेल्या असल्यामुळे सलग कथात्मक प्रसंगावर साहजिकच मर्यादा पडल्या असाव्यात. काही लौकिक मूर्ती आहेत.त्यांत संगीतकार, नृत्यांगना,सरदार, सैनिक, प्रेमी युगुले, शृंगारशिल्पे इत्यादींचे शिल्पांकन आहे आणि एकूण सर्व मूर्ती उठावदार (हाय रेलीफ ) स्वरूपात आढळतात. या मूर्तीत बैठ्या मूर्तींचे प्रमाण जास्त आहे. आणि उभ्या मूर्ती तुलनात्मक दृष्ट्या (बाणेश्वरचा अपवाद सोडता) कमी आहेत. रूपणकलेच्या  या प्रतिकृतींमध्ये बाह्यरेषांचे कौशल्यपूर्ण लालित्य आहे. पण त्यात शारीरीय यथार्थता आणि अचूकपणाचा पूर्ण अभाव आहे. अर्थात ही गोष्ट सर्वच मध्ययुगीन रूपणकलेविषयी-मूर्तींबाबत म्हणता येईल.तीच परंपरा मराठा कलाकाराने अनुसरली आहे. चुनेगच्चीतील मानवी मूर्तीत बाणेश्वर मंदिरावरील शिखरात बसविलेल्या उभट मूर्ती वगळता अन्यत्र सर्व मूर्ती अंगकाठीने भरलेल्या, पण लठ्ठ नाहीत. टोकदार लांब नाक,बरीच उतरती कपाळपट्टी आणि त्या मानाने आत गेलेली हनुवटी, मोठे व लांबसडक डोळे ही चेहरेपट्टीची काही वैशिष्ट्ये सर्वत्र दिसतात: मात्र पाय वरच्या शरीराच्या मानाने किंचित लहान वाटतात.बहुतेक सर्व मूर्ती समभंग अवस्थेतील आहेत. क्वचित एखादी मूर्ती त्रिभंग अवस्थेत किंवा गतिमान आढळते.उभ्या मूर्तीचा अनेकदा तोल गेलेला दिसतो;मात्र सर्व मूर्तींच्या मुद्रेवरील भाव स्पष्ट दिसतात.विशेषतः स्त्रियांच्या मूर्तींत बुटकेपणा प्रकर्षाने जाणवतो आणि शरीरयष्टी कृश आहे.काही निवडक मूर्तींचा अपवाद सोडल्यास बहुतेक स्त्री-प्रतिमांत त्यांची वक्षस्थळे लहान आहेत .कोठेही या मूर्तिसमूहास हिरे,कमळे, पर्णाकृती,भौमितिक रचनाबंध यांसारखी पारंपरिक आलंकारिक प्रतिमाने सुशोभीकरणासाठी वापरलेली आढळत नाहीत; मात्र काशीविश्वेश्वर, बाणेश्वर,काळेश्वर या मंदिरांतील मूर्तींभोवतीची चौकट नक्षीदार व पर्णफुलांनी सजविलेली आहे.शिवाय ती रंगविलेली असल्यामुळे मोहक दिसते. त्याचप्रमाणे भारतीय संस्कृतीतील, विशेषतः संस्कृत नाटके व साहित्य यांत वर्णन केलेल्या यौवनांमध्ये आढळणारी सिंहकटी, उन्नत उरोज, पृथुल नितंब ही पारंपरिक व आदर्शवत सौंदर्यलक्षणे येथे क्वचित दिसतात. त्यामुळे चुनेगच्चीतील स्त्री-प्रतिमा/अगदी शृंगार मूर्तीतूनसुद्धा/रसरशीत/उन्नत वाटत नाहीत.मराठा कलाकारांनी प्राचीन शिल्पांतील कामशिल्पांची परंपरा सांभाळण्यासाठी किंवा पुढे चालू ठेवण्यासाठी काही शृंगारशिल्पे घडविली आहेत. त्यांतून शारीरिक प्रमाणबद्धता,सौष्ठव आणि कामुकता यांचा काही प्रमाणात प्रत्यय येतो.एकूण चुनेगच्चीतील मूर्ती आणि मंदिरवास्तू यांमध्ये समन्वय व सुसंगती असून हे दोन्ही घटक एकमेकांना अत्यंत पूरक आहेत. किंबहुना त्यांचा संयोग फार कलापूर्ण साधला आहे.त्यामुळे मंदिर हेच मुळी एक आल्हाददायक शिल्प भासते.

या मूर्तिसंभारातील स्त्री-पुरुषांचा पोशाख अगदी साधा आहे.स्त्रियांनी सकछ नऊवारी साडी नेसली असून कचुंकी किंवा पोलके घातले आहे.क्वचित काही नृत्यांगनांमध्ये सलवार वा घागरा आढळतो किंवा चुणीदार पोषाख आढळतो. स्त्रियांच्या अंगावर मर्यादित अलंकार असून मुख्यत्वे त्यांत कंकणे,बाजूबंद,गळ्यात पुतळ्याची माळ किंवा मोत्यांचा कंठा,रत्नहार,कर्णफुले,तोडे,साखळ्या, बिंदी, केसांचा खोपा इत्यादी दागिने आढळतात.बहुतेक स्त्रियांनी चापून-चोपून केस बसविलेले असून लांब वेणी किंवा अंबाडा एवढीच केशभूषा सर्वत्र दिसते; तर पुरुषांनी बाराबंदी अंगरखा घातलेला असून धोतर नेसले आहे. काही पुरुषांच्या अंगावर  उपरणे घेतलेले दाखविलेले आहे.सैनिक-शिपाई यांचा पोषाख आधुनिक काळातील स्काउटच्या मुलांप्रमाणे आहे.सरदार व उच्चभू लोकांच्या अंगावर,कानात भिकबाळी,गळ्यात मोत्यांचा हार आणि डोक्यावर पगडी अशी मांडणी आढळते.पगडीचे विविध नमुनेही दृष्ष्टोत्पतीस येतात.ह्यात ब्रिटिश वापरीत असलेली हॅट एखाद्या पगडीच्या आकारात आढळते.हा ब्रिटिशांच्या संपर्क-सान्निध्याचा परिणाम असावा. क्वचित काही ठिकाणी रुमाल डोक्याला बांधला आहे.या पोषाख-अलंकारातून मराठा,संस्कृतीचे,विशेषतः लोकसंस्कृतीचे  दर्शन होते. मराठा कलाकाराला उत्तर-दक्षिणेकडील विविध कलाप्रकारांची-रूपकांची निश्चितपणे जाण असली पाहिजे;कारण त्याने उतरेकडील मंदिरातून दृग्गोचर होणारी प्रतिमाने-प्रतीके चुनेगच्चीतील मूर्तिकामात सर्रास वापरली आहेत; मात्र त्यात विविधता नाही. तद्ववतच अलंकरणाची ज्ञॉपके(मॉटिफ्-स)नाहीत.काही कलात्मक मंदिरे सोडली,तर उर्वरित मूर्तीत ठोकळेबाजपणा दिसतो.तद्वतच त्याच त्या देवतांच्या, सरदारांच्या प्रतिमा आढळतात. वैविध्य नाही आणि प्रतिमानांचे प्रकार मर्यादित आहेत. त्यामुळे मराठा रूपणकलेत मध्य भारतातील,विशेषतः माळवा-राजस्थानातील व दक्षिण हिंदुस्थानातील अभिव्यती क्रमश; अवनत होत जाऊन शेवटी एकोणिसाव्या शतकात ती हळूहळू लुप्त झाली.मराठा कलाकारांनी चुनेगच्चीतील मूर्तींना उठाव देऊन मराठ्यांना कलेविषयी आस्था व प्रेम आहे. हे स्पष्ट केले.महाराष्ट्रातील चुनेगच्चीतील मूर्तिकला ही मराठा कलाकारांचीच निमितीं आहे. तत्पूर्वी संदला-शिल्पनाचा सुशोभीकरणासाठी वापर झाला होता; पण मूर्तींची जडण-घडण क्वचितच केली जाई.

ढुंड़िविनायक मंदिर-

वरील मंदिरांपैकी ढुंडिविनायक आणि वाकेश्वर ही मंदिरे शिवकालीन आसून त्यांची शिखरे नंतर पेशवाईत, बहुधा उत्तर पेशवाईत (इ.स.१७५०-१८१८)मध्ये बांधलेली असावीत. ढुंडिविनायक मंदिराच्या शिखरावर मोरावर आरूढ झालेली सरस्वती व बाजूला तिच्या दोन सेविका यांच्या मूर्ती असून अगदी वर गणपतीची सुरेख मूर्ती पूर्वाभिमुख आहे. दक्षिणेकडील बाजूस सर्वात खालच्या स्तरात आलिंगनात मश्गुल असलेले एक दांपत्य आहे.