काशीविश्वेश्वर मंदिर

महागणपती मंदिराच्या च्या उत्तरेस फरसबंद घाट असून काही अंतरावर प्रशस्थ अशा आयताकार दगडी प्राकारात (१०४ * ३२ मीटर)व १ मीटर २२ सेमी.उंच चोंथरयावर काशीविश्वे मंदिर गणपतराव भिकाजी रास्ते यांनी इ.स १७५७ साली बांधले आणि आपल्या काशीनाथ नावाच्या मुलाच्या स्मरणार्थ काशिविस्वेश्वर हे नाव दिले. मंदिराच्या दक्षिणेला एक विहीर आहे. सभागृहाच्या दोन्ही बाजूंस उंच दीपमालास्तंभ आहेत.या स्तंभांवरच्या बाजूस कमलाकृती असून तेथे कुंभाची रचना आहे. त्यांची बांधणी अष्टकोनाकृती असून त्यांवर दिवे लावण्यासाठी हातखुंट्या बसविलेल्या आहेत. अगदी वरच्या बाजूस टेंभा लावण्याची व्यवस्था केली आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात पाच पायऱ्या उतरून गेल्यावर खोलगट जागी महादेवाची मोठी पिंड आहे. छत उघडलेल्या छत्रीप्रमाणे घुमटाकृती आकाराचे असून ते जसजसे वर जाईल,तसे लहान होत गेल्याचे दिसते.

सभागृहासमोरील नंदीमंडपात एकसंध काळ्या वालुकाश्मात घडविलेली कलाकुसरयुक्त झूल घातलेली काळी कुळकुळीत ,गुळगुळीत व चमकदार नंदीची भव्य मुर्ती आहे. हा नंदी अतिशय देखणा व रुबाबदार वाटतो.

काशीविश्वेश्वर मंदिर हे महागणपती मंदिराच्या उत्तरेला एका प्रशस्त दगडी तटबंदीयुक्त प्रकारात असलेले वाईतील अत्त्यंत सुस्थितीत व स्वच्छ परिसर असलेले कदाचित एकमेव मंदिर असेल! महाराष्ट्रातील चुनेगच्चीयुक्त मूर्तिसंभारासाठी प्रसिद्ध असलेल्या मंदिरात कदाचित ह्या मंदिराचा बराच वरचा क्रमांक लावावा, इतपत या मंदिराच्या शिखरावरील मूर्तिकाम सुस्थितीत अवशिष्ट आहे. देवदेवता, सरदारसरंजामदार, ऋषिमुनी, दशावतार, राधाकृष्ण, सरस्वती, गणपती, महिषासुरमर्दिनी इत्यादी मूर्ती मंदिराच्या वास्तूला अनुरूप ठरतील अशाच बेताने स्थापिल्या आहेत. या ठिकाणी अंगकाठीने स्थूल व किंचित बुटक्या मूर्तींचे प्रमाण जास्त आहे. अपवादादाखल काही मूर्ती ऊर्ध्वगामी उंच आहेत. शिवाय बैठ्ठ्या मूर्तीचे प्रमाण जास्त आहे.

नंदीमंडपासमोर मंदिराच्या प्रवेशद्वारावरील सभागृहाच्या शिखराच्या सर्वात खालच्या स्तरात (शीर्षपाद)डावीकडे दक्षिणेकडील कोनाड्यात महिषासुरमर्दिनी, मधे गणपती व उजवीकडे सरस्वती अशा तीन मूर्ती आहेत.

काशीविश्वेश्वर मंदिराच्या शिखराच्या सर्वात खालच्या स्तरात दक्षिणाभिमुख कोनाड्यात उजवीकडून अनुक्रमे तीन मूर्ती विशेष लक्षणीय आहेत. पहिली मूर्ती एका वीणाधारी तरुणीची आहे. तीत ही तरुणी उभी असून तिने दोन हातांत वीणा अशा पद्धतीने धारण केली आहे की, जणू ती या तंतुवाद्यातून धून काढीत आहे. तिचा पोशाख तिच्या सांगीतिक वर्तनाला साजेसा असा घागरा घातलेला असून तिने कर्णफुले, हातात बांगडया व गळ्यात एक साधा दागिना व पायात पैंजण एवढेच मोजके अलंकार घातलेले आहेत. तिच्या पायांच्या पुढे दोन पक्षी (त्यांची तोंडे तुटलीआहेत), राघू बसलेले असून ते तिच्या सांगीतिक कौशल्याने मंत्रमुग्ध झालेले आहेत. या वीणाधारी तरुणींची अंगकाठी प्रमाणबद्ध व लक्षवेधक आहे.