प्रास्ताविक

मराठेशाहीत विशेषतः शिवोत्तरकाळात आणि प्रामुख्याने पेशवाईत वाईची सर्वांगीण प्रगती झाली. तीर्थक्षेत्र म्हणून वाईचे महत्त्व वाढले, तसेच पर्यटनस्थळ म्हणूनही त्यास अलीकडे अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.याचे कारण म्हणजे उत्तर पेशवाईत रास्ते घराण्यातील सरदारमंडळीनी तसेच त्यांच्या मांडलिक-आश्रितांनी दानधर्माबरोबरच अनेक प्रासाद व मंदिरे बांधली.हे प्रासाद भित्तिचित्रांनी सुशोभित केले आणि मंदिरे चुनेगच्चीतील मूर्तीनी अलंकृत करण्यात आली. हे मध्ययुगीन वास्तुशिल्पशैलीने नटलेले कलावशेष पर्यटकांचे आकर्षण बनले असून त्यांचा आढावा प्रस्तुत लेखात घेतला आहे.

वाई व तिच्या परिसरात लहान-मोठी शंभराहून अधिक मंदिरे होती. यांतील काही जमीनदोस्त झाली आहेत, तर काहींची पडझड झाली आहे; मात्र काही अजूनही सुस्थितीत आहेत. यांतील बहुसंख्य मंदिरे कृष्णा नदीच्या काठी,काही प्रत्यक्ष नदीपात्रात, तर काही नदीपासून उत्तरेला नैसर्गिक सपाटीवर तसेच नदीच्या दक्षिण काठावर( सिद्धेश्वर,वाकेश्वर) बांधलेली आढळतात. यांपैकी ढुंड़िविनायक,भद्रेश्वर, वाकेश्वर, सिद्धेश्वर,महाकाली,रोकडोबा वगैरे मंदिरे शिवकालीन असून अन्य मंदिरे ही पेशवेकालीन छत्रपती शाहूमहाराजांच्या कारकिर्दीत(इ.स.१७०८-४९ )आणि त्यानंतरच्या विशेषतः उत्तर पेशवाई काळातील आहेत. ही सर्व मंदिरे वास्तुशिल्पशैलीच्या दृष्टीने माळव्यातील भूमीज या उपवास्तुशैलीतून उत्क्रांत झालेल्या नागरशैलीत(इंडो-आर्यन)बांधलेली आहेत.ही शैली प्रथम यादव व शिलाहार वंशांतील राजांनी विकसित केली. पुढे तीत हेमाद्री उर्फ हेमाडपंथ या यादवांच्या करणाधिपमंत्र्याने काही बदल केले. या बदलांमुळे मंदिरवास्तूतील शिल्पकला जवळजवळ  संपुष्टात येऊन त्यास केवळ वास्तुरूप प्राप्त झाले आणि ती वास्तुशैली हेमाडपंती शैली  या नावाने  प्रसृत झाली. तथापि या शैलीतील काही मंदिरे ही वास्तुशिल्प  म्हणता येतील, अशी रेखीव, लक्षवेधक  आणि  आकर्षक आहेत.पुढे या शैलीस नव-यादव हे नामाभिधान मिळालेआणि त्यात इंडो-सॅरसॅनिक किंवा आदिलशाही (इस्लामशैली)  शैलीतील काही वास्तुविशेष आणि स्थानिक घटकांची सरमिसळ झाली.शिवाय दाक्षिणात्य व मुस्लिम वास्तुशैलींच्या विशेषत; आदिलशाही (इस्लामी) वास्तुशैलीच्या घटकांचे मिश्रण होऊन एक स्वतंत्र मराठा वास्तुशैली प्रचारात आली. या शैलीत शिखरांच्या रचनेत आदिलशाहीकालीन फुगीर (कलशाच्या) घुमटाचा व मनोऱ्यावर  प्रभाव अनुक्रमे आमलक , कुंभ आणि शिखराच्या उभटपणात दिसतो; तर गर्भगृहाच्या दगडी भिंतीवर चुना व विटांच्या काही शिखरांच्या   बांधकामात  दक्षिणेकडील गोपुरांचा प्रभाव जाणवतो. त्यांच्यातील आयताकार, अष्टकोनीय वा अनेककोनीय योजनाप्रकार आढळतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे तासगाव (सांगली जिल्हा) येतील गणपती मंदिराच्या प्राकारातील गोपूर होय.मात्र मूळ नागर वास्तुशैलीचे  परंपरागत घटक वा अभिलक्षणे तशीच राहिली असून शिल्पांचे अलंकरण पूर्णतः संपुष्टात आले आहे . त्यामुळे साहजिकच वास्तुशैलीला प्राधान्य प्राप्त झाले.वास्तुशास्त्रदृष्ट्या या मंदिरांचे मूळ विधान आराखडे चतुरस्त्र किंवा क्वचित तारकाकृती असून शिखरच्या बांधकामात आयताकार,अष्टकोन वा अनेक कोन दृग्गोचार होतात. बहुतेक सर्व मंदिरांच्या शिखराच्या खालच्या भागाचे बांधकाम पायापर्यंत घडीव दगडांमध्ये केलेले  आहे आणि शिखरे वीट व चुन्यात  बांधली आहेत. मराठ्यांच्या दक्षिण व उत्तर हिंदुस्तानातील  संचारा- संपर्कामधून  इस्लामी व दक्षिणात्य वास्तुघटक  मराठा मंदिराच्या वास्तुशैलीत प्रविष्ट झाले आहेत; कारण तिकडचे  कारागीर   मराठ्यांसोबत  आल्याच्या नोंदी आहेत. या एकाच वास्तुशैलीची अनेक मंदिरे शहरात विखुरलेली आढळतात. या सर्व मंदिरांत महादेवाच्या  मंदिरांचे प्रमाण जास्त  आहे. त्यातील वाकेश्वर ,चक्रेश्वर ,त्रिशुलेश्वर,उमामहेश्वर,बानेश्वर,भद्रेश्वर, कोटेश्वर , गंगारामेश्वर,रामेश्वर, काशीविश्वेश्वर ,कालेश्वर,गोविंदरामेश्वर ही शिवमंदिरे असून इतर मंदिरांत महागणपती (ढोल्या गणपती), महालक्ष्मी, महाविष्णू,व्यंकटेश, दत्तात्रेय,ढूडीविनायक, कालीमाता वगैरे अन्य देवतांची मंदिरे  आहेत.

कालदृष्ट्या या मंदिरांचे तीन स्वतंत्र विभाग पडतात. मराठा अमलातील विशेषतः शिवकालातील(१६४७ ते १७०७), पूर्व पेशवाईतील(१७०८ ते १७४९)आणि उत्तर पेशवाईतील(१७४९ ते १८१८)व नंतरची मंदिरे होत.

वाकेश्वर, सिद्धेश्वर  व ढूडीविनायक(गणपती)ही मंदिरे त्यांवरील शिल्पे, गर्भगृहातील वितान (छत)  आणि दगडी स्तंभ यावरून शिवपूर्वकाळातील पण यादव काळानंतरची सुमारे पंधराव्या-सोळाव्या शतकांतील असावीत.शांताश्रम समाधी १७१९ बाणेश्वर (१७४२ ) काळेश्वर १७४४ कौंतेश्वर १७४८ वगैरे काही फारच थोडी पूर्व पेशवाईतील वाईतील मंदिरे असून उर्वरित बहुतेक मंदिरे उत्तर पेशवाईतील,प्रामुख्याने रास्ते घराण्याकडे सरंजाम व सरदारकी                                आल्या नंतरची किंवा त्यांच्या आश्रितांनी-सावकारांनी बांधलेले आहेत.त्यानंतरही ही मंदिरवास्तुबांधणी पुढे १९ व्या शतकात चालू होती. ह्या काळात रामेश्वर (१८०३) व्यंकटेश (इ.स.१८६१),कोटेश्वर(इ.स.१८७०),पुलाखाली दत्तात्रेय (इ.स.१८६१), राधाकृष्ण(मथुरापुरी- १९०८)वगैरे मंदिरे याच वास्तुशैलीत बांधली गेली.सामान्यतः या मंदिरातून गर्भगृह व सभामंडप ही  दोनच दालने आढळतात.काही मंदिरे तर फक्त गर्भगृह व पुढे छोटा सोपा एवढीच आहेत,मात्र काही मोठ्या मंदिरातून(काशीविश्वेश्वर)गर्भगृह,अंतराळ,रंगमंडप वा सभामंडप आणि नंदीमंडप ही प्रमुख दालने आढळतात.